Sindhudurga: गोवेरीत लोखंडी साकव कोसळून पाचजण जखमी, सुदैवाने दोन चिमुकले बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:46 AM2023-07-10T11:46:37+5:302023-07-10T12:22:16+5:30
जखमींना कुडाळ व वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
कुडाळ : गोवेरी भगतवाडी येथील लोखंडी साकव कोसळून पाच जण पाण्यात कोसळून जखमी झाले. जखमींना कुडाळ व वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच जखमींचे मोबाईल तसेच इतर साहित्यही पाण्यात पडल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. एक लहान मुलगा व मुलगी वाचली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
वेंगुर्ला येथील काहीजण कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आले होते. ते सर्वजण गोवेरी भगतवाडी येथील साकवावरून जात असताना त्या लोखंडी साकवाचा काही भाग कोसळला व तेथून जाणाऱ्या सहा जणासह एक लहान मुलगा खाली पडला. यामध्ये तीन महिलांसह पाचजण जखमी झाले.
ही घटना समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी तत्काळ तेथे जात जखमींपैकी दोघांना कुडाळ तर तिघांना वेंगुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी काहींचे मोबाईल व इतर साहित्य ही पाण्यात पडले. मागून येणारी माणसे ही साकवावर आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी दिली.
अडकल्याने लहान मुलगा वाचला
या घटनेत सहा जणासह एक तिसरीतील मुलगा ही खाली कोसळला. सुदैवाने हा मुलगा साकवाच्या एका भागाला अडकून राहिला त्यामुळे तो वाचला.
वडिलांनी मुलीला वाचविले
या घटनेत एका लहान मुलीला घेऊन तिचे वडील जात होते. त्याच क्षणी हा साकव कोसळला व त्यांनी तत्काळ मुलीला बाजूला ओढून घेतले व सुदैवाने ती छोटी मुलगी वाचली.
तो लोखंडी साकव सुमारे २५ वर्षे जुना असून त्याची उंची सुमारे २५ ते ३० फूट आहे. या साकवाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र अजूनही दुरुस्ती करण्यात आली नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.