चिपळुणात पावणेतीन कोटींचे केटामाईन जप्त पाच अटकेत
By Admin | Published: May 25, 2014 12:43 AM2014-05-25T00:43:17+5:302014-05-25T01:15:42+5:30
कोट्यधीश व्हायला गेले अन् चतुर्भूज झाले
चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीतील केटामाईन पावडर चोरून ती विक्री करणार्या पाचजणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी या तरुणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. कोकणात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. चिपळूण शासकीय विश्रामगृहाजवळ पाच तरुण केटामाईन पावडर घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांना मिळाली. फोर्ड आयकॉन (एमएच १२/डीई ४५२८) या गाडीतून ही पावडर आणली जात असल्याची माहितीही मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे, निरीक्षक बाजीराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कुदळे, हेडकॉन्स्टेबल महिपती जामदार, सुभाष माने, सुनील पवार, दिनेश आखाडे, संदेश सारंग, जमीर पटेल, वैभव मोरे, रमीझ शेख, मिलिंद चव्हाण, दिनेश कोटकर यांनी पंचांसह वेगवेगळे दोन गट तयार केले. ते विश्रामगृह परिसरात दबा धरून बसले. थोड्या वेळाने तेथे आयकॉन फोर्ड गाडी आली. त्यातून सागर दत्ताराम महाडिक (वय २६, रा. घाणेखुंट), मंगेश सीताराम चाळके (३३), नीलेश अनंत चव्हाण (२६), दीपक दिलीप खेराडे (२९) व त्याचा भाऊ दिनेश दिलीप खेराडे (२८, सर्व रा. पीरलोटे) हे पाच तरुण खाली उतरले. त्यांना पकडून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन किलो ९८० ग्रॅम केटामाईन नावाचा अमली पदार्थ हस्तगत केला. शिवाय आयकॉन गाडी व रोख ८३० रुपये जप्त केले. केटामाईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत निश्चित नसली तरी ७० लाख रुपये किलो दराने ते विकले जाते. ३ किलो ९८० ग्रॅम केटामाईनची किंमत २ कोटी ७८ लाख ६० हजार रुपये आहे. आयकॉन कार आणि रोख ८३० रुपये असा २ कोटी ८१ लाख ६० हजार ८३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे करीत आहेत. (प्रतिनिधी)