पाच चोरट्यांना रंगेहाथ पकडले-तिघे पोलीस ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 08:00 PM2019-07-11T20:00:23+5:302019-07-11T20:01:36+5:30
अटक केलेल्या संशयितांचा जिल्ह्यातील अन्य चोºयांमध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैभववाडी : तिथवली धरणाच्या लोखंडी साहित्याची चोरी करताना तळेरेतील सुरक्षारक्षक व ग्रामस्थांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. परंतु, टेम्पोसह दोघे त्यांच्या तावडीत सापडले तर तिघे घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडलेल्या दोन संशयितांना टेम्पोसह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पळून गेलेले तिघे साथीदार पोलीस ठाण्यात हजर झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. अटक केलेल्या संशयितांचा जिल्ह्यातील अन्य चोºयांमध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिथवली येथील जलसंधारण विभागाच्या धरणावर चंद्रकांत सखाराम दळवी हे सुरक्षारक्षक म्हणून कामास आहेत. मंगळवारी दुपारी धरणाच्या पायथ्याशी एक टेम्पो आणि दोन-तीन लोक संशयितरित्या फिरताना दळवी यांना आढळून आले होते. त्यामुळे संध्याकाळी घरी न जाता पाळतीसाठी तिथवलीतील पांडुरंग धुळाजी काडगे यांच्याकडे दळवी थांबले होते. धरणापासून हे ठिकाण सुमारे ५० ते ६० मीटरवर आहे. त्यामुळे रात्री १० च्या सुमारास त्यांना आधी वाहनाचा व थोड्या वेळाने लोखंडाचा आवाज ऐकायला आला.
त्यामुळे काडगे यांना सोबत घेऊन दळवी धरणाकडे गेले. त्यावेळी त्यांना एक टेम्पो आढळून आला. टेम्पोत एकजण बसला होता. तर दुसरा बाहेर होता. त्यांना पकडून ठेवत दळवी यांनी पोलीस पाटील गणेश हरयाण यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.
त्यामुळे महादेव हरयाण, उमेश हरयाण, सलीम काझी, बाळा ईस्वलकर, सदाशिव हरयाण, सादिक काझी आदी ग्रामस्थांसह हरयाण घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील हरयाण यांनी या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर सहाय्यक उपनिरीक्षक उल्हास खोबरेकर, पोलीस शिपाई मारुती साखरे, सागर रोहिले, चालक देसाई यांनी घटनास्थळी जाऊन राजाराम प्रभू इंगळे (२८) व भीमराव प्रभू इंगळे (३२, रा. तळेरे पेट्रोल पंपानजीक) या दोघा भावांसह टेम्पो (एम. एच. ०८; एपी-१०२६) ताब्यात घेतला.
संशयित चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणल्यावर चौकशी करताना आणखी तिघेजण दळवी व काडगे यांची चाहूल लागताच पळून गेल्याचे इंगळे बंधूंनी पोलिसांकडे कबूल केल्याने पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून हजर होण्यास सांगितले. त्यामुळे राजू कोंडिबा शिंदे, लक्ष्मण तुळजाराम शिंदे व विनोद पुंडलिक वाघमारे (तिन्ही राहणार तळेरे) हे स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले.
गुन्हा दाखल
पोलिसांनी या पाच जणांविरूद्ध संगनमताने सरकारी मालमत्तेच्या चोरीचे प्रयत्न केल्याबद्दल भा.द.वि. कलम ३१९,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवून अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
भंगार व्यावसायिक असलेल्या या संशयितांचा जिल्ह्यातील अन्य चोºयांमध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेतले.