पाच हजार हेक्टरवरील भात, नाचणीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:03 AM2019-11-06T11:03:30+5:302019-11-06T11:04:57+5:30
क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
देवगड : क्यार वादळामुळे देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात व नाचणी शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आदेश देऊनही कृषी व महसूल विभागामार्फत संथगतीने पंचनामा प्रक्रिया सुरू असल्याबाबतची नाराजी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
देवगड तालुक्यामध्ये शेतकरी उदरनिवार्हासाठी भात व नाचणी शेती करतात. क्यार वादळामुळे भातशेती कापणीच्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने भातशेती व नाचणी शेतीचे नुकसान झाले. ऐन कापणीच्यावेळीच पावसाने थैमान घातल्याने हातातोंडाशी आलेल्या पिक पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले.
शासनस्तरवरून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले. मात्र दिवाळीच्या सुटीत बहुतांश कर्मचारी हे रजेवर गेल्याने देवगड तालुक्यातील पंचनाम्याची प्रक्रिया रखडली होती.
मात्र दिवाळी संपल्यानंतर कर्मचारी हजर झाले तरीही ज्या गतीने पंचनामे करणे गरजेचे होते तशा पध्दतीने ते होत नसून संथगतीने ही प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आतापर्यंत तालुक्यामध्ये सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले आहेत. अद्याप सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नुकतेच देवगड तालुक्यामध्ये भातशेती व मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी व मच्छिमारांनी आपल्या समस्या मांडून नुकसानीची माहिती दिली.
तत्काळ पंचनामे करा
मच्छिमार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानी देण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले. मात्र किती क्षेत्राचे नुकसान झाले, पंचनामा प्रक्रिया कशा पद्धतीने झाली याची माहिती मात्र त्यांनी घेतली नाही. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनामे होणे गरजेचे आहेत. मात्र संथगतीने सुरू असलेल्या पंचनाम्याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.