कणकवलीत रोज पाच टन कचरा

By Admin | Published: August 19, 2015 10:56 PM2015-08-19T22:56:15+5:302015-08-19T22:56:15+5:30

व्यवस्थापन आवश्यक : गार्बेज डेपोची मर्यादा संपणार लवकरच

Five tonnes of garbage in Kankavali | कणकवलीत रोज पाच टन कचरा

कणकवलीत रोज पाच टन कचरा

googlenewsNext

कणकवली : वेगाने विकसित होणाऱ्या कणकवली शहरात कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. सुमारे १७ हजार लोकसंख्येच्या या शहरात रोज पाच टन कचरा गोळा होत आहे. हा कचरा शहराबाहेरील कचरा डेपोत सध्या फक्त टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्यास लवकरच कचरा डेपोची मर्यादा संपणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच पावले उचलावी लागणार आहेत. कणकवली शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील कचरा गोळा केला जातो. १२ घंटागाड्या घरोघरचा कचरा गोळा करतात. कचरा गोळा करण्याच्या कामी नगरपंचायतीचे नियमित १० कर्मचारी आणि कंत्राटी ३० कर्मचारी असे एकूण ४० कर्मचारी राबतात. त्याशिवाय कायझन गाड्या फिरवल्या जातात.शहरात प्रभागनिहाय कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ३१ कचरा पेट्यांमध्ये शहरातील कचरा गोळा होतो. ट्रॅक्टरमधून हा कचरा शहराबाहेर नागवे गावच्या सीमेलगत असलेल्या कचरा डेपोत टाकला जातो. शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा कचरा डेपो आहे. कचरा डेपो पाच एकर जागेत आहे. सध्या कोणतीही प्रक्रिया न करता कचरा टाकला जातो. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिग येथे जमा होत आहेत. प्रक्रिया न करता येथे असाच कचरा टाकत राहिल्यास सुमारे पाच वर्षांतच कचरा डेपोची मर्यादा संपुष्टात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. विकसीत होणाऱ्या शहरांसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन ही डोकेदुखी होत आहे. रोज टनावरी गोळा होणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय? हा प्रश्न शहरांना भेडसावत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा रोजच्या रोज उचलून अन्यत्र टाकणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये गुंतवणुकीची गरज असते. तसेच तो चालवण्यासाठीही शहर प्रशासन सक्षम असावी लागते. सध्या कणकवली नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे परवडणारे नाही. (प्रतिनिधी)

वस्ती वाढल्यास कचरा वाढणार
शहरात आता नोंदणीनुसार सुमारे १७ हजार लोकसंख्या आहे. मात्र दिवसेंदिवस शहरवासीयांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे कचरा समस्येवर तातडीने पावले उचलावी लागतील.
प्रक्रिया केल्यास २५ वर्षांची मर्यादा
कणकवली शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केल्यास कचरा डेपो २५ वर्षे वापरला जाऊ शकतो. अन्यथा लवकरच हा डेपो वापरण्याची मर्यादा संपुष्टात येईल.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीचा विचार नगरपंचायतीने केला होता. मात्र, हा प्रकल्प उभारणीसाठी कोट्यवधींचा निधी लागेलच. त्याचबरोबर प्रकल्प चालवण्यासाठी छोट्या स्तरावरील नगरपंचायत सक्षम नाही. कचरा व्यवस्थापनासंदर्भात आयआयटी पवईमध्ये संशोधन झालेले मॉडेल पाहून त्याचा कणकवलीसाठी विचार केला जाणार आहे.
-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत.

Web Title: Five tonnes of garbage in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.