Sindhudurg: चिरे वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले, देवगड तहसीलदारांची कारवाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 27, 2023 06:51 PM2023-09-27T18:51:50+5:302023-09-27T18:52:23+5:30
सिंधुदुर्ग : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जांभ्या दगडाचे चिरे वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकांवर कारवाई करून एक लाख ४७ हजार ७७५ ...
सिंधुदुर्ग : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जांभ्या दगडाचे चिरे वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकांवर कारवाई करून एक लाख ४७ हजार ७७५ रुपयांचा दंड देवगड तहसीलदारांनी ट्रकमालकांना ठोठावला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
तालुक्यातील नांदगाव देवगड मार्गावरील तोरसोळे फाटा येथे पाच ट्रक मोठी वाहने चिरे वाहतूक करीत असताना अडवत ती ताब्यात घेतली आहे. ही पाचही वाहने देवगड तालुक्यातून कोल्हापूर कर्नाटकच्या दिशेने चिरे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर एक लाख ४७ हजार ७७५ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे चिरे वाहतूक करणारे ट्रक हे देवगड तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत.
गणेश चतुर्थी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपली वाहने घेऊन कोकणात येत असल्यामुळे अवजड वाहनांमधून चिरे वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी राजकीय पक्षांसह नागरिकांमधून करण्यात आली होती; परंतु, याला चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांनी तिलांजली देत चिरे वाहतूक सुरूच ठेवली. या मुजोर वाहनचालकांना अखेर तहसीलदार रमेश पवार यांनी चांगलाच दणका देत सुमारे पाच अवजड वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांचे धाबे दणाणले आहेत.
चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले
या मोहिमेत देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी चव्हाण, मंडळ निरीक्षक पावस्कर, तलाठी बोडके, नाडे या पथकाने ही कार्यवाही केली आहे. या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगाने येतात. अपघातात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होत होता. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या वाहनांवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून चिरेखाण व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत