ध्वज स्तंभानजिक शोषखड्डा
By admin | Published: September 23, 2015 10:25 PM2015-09-23T22:25:09+5:302015-09-24T00:04:46+5:30
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कुडाळ पंचायत समितीकडील प्रकार
कुडाळ : पंचायत समितीच्या परिसरातील ध्वज व संविधान स्तंभाच्या शेजारीच शौचालय शोषखड्डा टाकी बांधण्यात येत असून तेथील ध्वज व संविधान स्तंभाच्या दृष्टीने हे अत्यंत अपमानास्पद कृत्य आहे. मात्र, या गोष्टीकडे पंचायत समिती सदस्यांनी दुर्लक्ष केल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ पंचायत समितीच्या परिसरात गटविकास अधिकारी यांच्यासाठी नवीन शौचालय बांधण्यात येत आहे. या शौचालयाचा शोषखड्डा टाकी ज्या ठिकाणी बांधण्यात येत आहे त्याच्या बाजुलाच ध्वज स्तंभ तसेच संविधान स्तंभ पंचायत समिती सुरू झाल्यापासुन आहे.
यामुळे शोषखड्डा या स्तंभाच्या बाजूला बांधून एका प्रकारे ध्वजस्तंभ व संविधान स्तंभाचा अपमान असल्याचे मत पंचायत समितीत येणाऱ्या जनतेतून बोलले जात आहे.
या सर्व गोष्टीकडे येथील पंचायत समिती सदस्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जनतेमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या परिसरातील शोषखड्डा टाकीची जागा बदलण्यात येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले
आहे. (प्रतिनिधी)
शोषखड्डा बांधणे कितपत योग्य ?
संविधान स्तंभावर भारताचे संविधान लिहिले आहे तर दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहिलेली आहेत. त्यामुळे या स्तंभाच्या शेजारी शौचालयाचा शोषखड्डा बांधणे किती योग्य आहे. हाही प्रश्न जनतेला पडत आहे.
शौचालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्य
एकीकडे कुडाळ पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालये आहेत. मात्र, त्या शौचालयांची स्वच्छता ठेवण्यात येत नाही. त्यामुळे त्या शौचालयांच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. असे असताना नव्याने हा घाट का घातला जातो, असा प्रश्न आहे.