चिपी येथून तिसऱ्या विमानाचे उड्डाण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:31 AM2019-04-22T10:31:26+5:302019-04-22T10:33:22+5:30
चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या की पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होणार आहे.
कुडाळ : चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या की पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या. त्यानंतर ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. सध्या दिल्ली येथे जेटच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने त्यावर तोडगा निघावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रभू हे चिपी विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.
यावेळी आयआरबी प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर, भाजपचे मालवण तालुकाप्रमुख विजय केनवडेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई, सारस्वत बँकेचे सुशांत सामंत, परुळेबाजारचे माजी सरपंच संजय दुधवडकर, कालिदास चिपकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रभू यांनी चिपी विमानतळ तातडीने सुरू व्हावा म्हणून हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रयत्न सुरू केले. केंद्र शासनाच्या हवाई वाहतूक मंत्रालयातील विविध योजनांमध्ये सिंधुदुर्गमधील चिपी आणि रत्नागिरी विमानतळांचा सहभाग करून घेतला आहे. त्यामुळे येथे विमानसेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा पर्यटनवाढीसाठी होणार आहे