पर्यटन वाढीसाठी फ्लोटिंग जेटी गरजेची : मोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 11:18 PM2015-05-11T23:18:31+5:302015-05-11T23:25:34+5:30

अपघात टाळता येणे शक्य, प्रयत्न हवेत...

Floating jetty needed for tourism growth: Mokal | पर्यटन वाढीसाठी फ्लोटिंग जेटी गरजेची : मोकल

पर्यटन वाढीसाठी फ्लोटिंग जेटी गरजेची : मोकल

Next

कोकणातील पर्यटन व्यवसायाला वृध्दी आली असली तरी समुद्र स्नानासाठी उतरलेल्या अननुभवी पर्यटकांनी यातून काही बोध घेणे आवश्यक आहे. यंत्रणेने पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. मात्र, पर्यटकांचे अपघात टाळण्यासाठी अशा किनाऱ्यावर फ्लोटिंग जेटी हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असे मत पर्यटन अभ्यासक, दापोलीचे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केले.
कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारा यामुळे कोकणाकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढू लागली आहे. समुद्राच्या पाण्यात काही पर्यटकांचे जीवही गेले आहेत. त्यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी फ्लोटिंग जेटी हा योग्य पर्याय असल्याचे मत पर्यटनतज्ज्ञ, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केले.
प्रश्न : कोकणातील समुद्र किनाऱ्यावर फ्लोटिंग जेटी झाल्यास काय फायदा होईल ?
उत्तर : कोकण किनारपट्टीवर ठिकठिकाणी फ्लोटिंग जेटी झाल्यास पर्यटकांचा जीव वाचेल. किनाऱ्यावरील पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल. अलिकडे पर्यटकसुद्धा सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर पर्यटन करताना दिसत आहेत. परंतु कालांतराने समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक बदलामुळे पाण्यात भोवरा तयार होणे, उंच - खोल भाग तयार होणे असे बदल झाल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. त्यात पर्यटकांचा मृत्यू होतो. फ्लोटिंग जेटीमुळे जीव गमवावा लागणार नाही व सुरक्षित पर्यटनाचा आनंदही मिळेल.
प्रश्न : फ्लोटिंग जेटीची गरज कुठे आहे व का?
उत्तर : जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक गणपतीपुळेला येतात. सर्वाधिक बळीसुद्धा गणपतीपुळेलाच गेले आहेत. त्यामुळे गणपतीपुळे, गुहागर, मुरुड, हर्णै, कर्दे, कोळथरे, आंजर्ले, केळशी, जंजिरा मुरुड, काशीद, अलिबाग येथे फ्लोटिंग जेटीची गरज आहे. एखाद्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या चुकीमुळे मृत्यू झाल्यास त्याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होतो. सर्वत्र चुकीचा संदेश जातो. त्या ठिकाणी पर्यटक येण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांच्या जीवाची काळजी आपण घ्यायला हवी तरच पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील.
प्रश्न : पर्यटनाला मोठा वाव कसा ?
उत्तर : कोकणच्या पाचही जिल्ह्यात लागून सुमारे ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. एकट्या मुंबई जिल्ह्याची लोकसंख्या तीन कोटी आहे. उर्वरित ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त ४० ठिकाणी पर्यटकांना समुद्रकिनारी मौजमजा करण्याची सोय आहे. समुद्रातील पाण्याचा प्रवाह, समुद्राच्या लाटांचा वेग, भरती - ओहोटीचे गणित लक्षात न आल्याने काही हौशी पर्यटक नाहक बळी पडतात.
दि. १९ आॅगस्ट २०१२ रोजी गणपतीपुळ्याला एकाच दिवशी सात पर्यटक बुडाले. त्यानंतर महाराष्ट्र शासन खडबडून जागे झाले. सगळीकडे आदेश सुटले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली. मुंबईच्या ए. सी. आॅफीसमध्ये बसून योजना ठरली. या योजनेचे नाव सुरक्षित जलतरण क्षेत्र योजना.
प्रश्न : नेमकी सिस्टीम कशी आहे.?
उत्तर : बीच रेस्क्यू सिस्टीम या योजनेमध्ये निरीक्षण मनोरा, लाईफ गार्ड, पेट्रोलिंग गार्ड, छोटी यांत्रिक बोट, गतिमान वॉटर स्कूटर, फुगे, समुद्रकिनारी ए. सी. आॅफीस, गोडावून इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे. मेकॅनिक व १० कुशल कर्मचारी प्रत्येक ठिकाणी नेमण्यात येतील. आॅफीससाठी एक ए. सी. गाडी व एखाद्या अ‍ॅम्ब्युलन्सची आवश्यकता लागेल. जेव्हा कधी अपघात होईल तेव्हा यातला एकहीजण हजर नसेल हे ओघाने आलेच. महाराष्ट्र शासनाचा हा नाहक खर्च आहे, असे मला वाटते.
प्रश्न : तुम्ही सोपा उपाय म्हणता तो काय आहे?
उत्तर : समुद्रात पोहणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बीच रेस्क्यू सिस्टीम या योजनेपेक्षा एक सोपा उपाय मला सुचवावासा वाटतो. त्या योजनेचे नाव आहे ‘आरसीसी कम फ्लोटिंग जेटी’. या जेटीला निदान ५० वर्षे तरी दुरुस्ती खर्च येणार नाही. फ्लोटिंग जेटीच्या ठिकाणी लाईफ गार्ड म्हणून फक्त दोनच कर्मचारी ठेवावे लागतील.
कोकणात समुद्राला सहा तास भरती व सहा तास ओहोटी असते. पौर्णिमा व अमावास्येला मोठी भरती असते. तसेच त्यादिवशी मोठी ओहोटीही असते. ओहोटीच्या वेळी किनाऱ्यापासून समुद्राचे पाणी दूरवर म्हणजे सुमारे ९०० फूट दूर जाते. कोकणात समुद्राला सुमारे ९ फूट उंचीची जास्तीत जास्त भरती येते. पावसाळ्यात वादळी हवामानामुळे लाटा अधिक उंचीने समुद्रकिनारी जोराने धडक देतात. काही ठिकाणी भौगोलिक रचनेमुळे व समुद्रातील प्रवाहामुळे समुद्राच्या लाटांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात.
प्रश्न : अपघात टाळणार कसे ?
उत्तर : कोकणातील समुद्रकिनारी साऱ्या महाराष्ट्रातून पर्यटक येतात. त्यांना मार्गदर्शन करण्याची शासनाची एकही योजना नाही. किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी एकही पोलीस हवालदार नाही. काही पर्यटक दुष्काळी भागातून येतात. एखाद्या धरणाचे बॅकवॉटर पाहिलेली ही मंडळी मैलोनमैल पसरलेला अथांग समुद्र पाहिल्यावर अचंबित होतात. या सर्व पर्यटकांना समुद्रस्नान करण्याचा मोह आवरत नाही. समुद्राच्या लाटात मौजमजा करायची असते. पर्यटकांना समुद्रात छोट्या होडीतून फेरफटका मारावयाचा असतो. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फ्लोटिंग जेटी हाच रामबाण उपाय आहे.
फ्लोटिंग जेटी बांधताना समुद्र किनाऱ्यापासून ते ओहोटीच्या अंतिम सीमेपर्यंत सुमारे ९०० फूट लांबीची १५ फूट रुंदीची जेटी बांधणे आवश्यक आहे. या जेटीच्या समुद्राकडील टोकाला काटकोनात १०० फूट लांब व २० फूट रुंद अशी जेटी बांधावी लागेल. जेणेकरुन या आरसीसी जेटीचा आकार इंग्रजी ‘टी’ या अक्षरासारखा असेल. या जेटीची उंची सुमारे १५ फूट ठेवावी लागेल. आवश्यकता असल्यास व पर्यटकांना छोट्या होडीमध्ये बसणे सोयीचे व्हावे म्हणून आरसीसी जेटीला फ्लोटिंग जेटी जोडता येईल. फ्लोटिंग जेटीला वापरण्यात येणारे मटेरियल हे पाण्यात तरंगते. त्यामुळे भरती - ओहोटीला ती जेटी वर-खाली होईल. फ्लोटिंग जेटीला होडी समांतर उभी राहिल्यामुळे होडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल. फ्लोटिंग जेटीचा तरंगता धक्का पावसाळ्यात काढून ठेवता येतो व पुढील हंगामात परत वापरता येईल. त्यामुळे पर्यटकाना समुद्रस्नान करणे सोपे होईल. अपघात होणार नाहीत, अशा प्रकारची सोय केल्यास पर्यटन वाढीस मदतच होईल. मात्र, त्यासाठी कुशल अधिकारी हवेत, असे मत व्यक्त केले.
- शिवाजी गोरे

Web Title: Floating jetty needed for tourism growth: Mokal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.