खारेपाटणात पूरस्थिती; रस्ता पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 07:01 PM2016-07-12T19:01:05+5:302016-07-13T00:50:39+5:30
दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले : गावाचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत
खारेपाटण : गेले बरेच दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे खारेपाटणमध्ये पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून खारेपाटण गावात येणारा महामार्ग ते बसस्थानक हा प्रमुख रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला. तर खारेपाटण शहरात पुराचे पाणी संध्याकाळच्या व विशेष करून रात्रीच्या वेळेत घुसल्यामुळे व्यापारी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट झाली. याबाबत अधिक वृत्त असे की, सोमवारी दुपारी १ वाजल्यानंतर खारेपाटण बाजारपेठ बंद होती. अचानक पावसाने सोमवारी सायंकाळी जोरदार सुरवात केल्याने खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसले. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यापारीवर्गाने आपले सामान इतरत्र हलविण्यास सुरवात केली होती.
तर तळगांवकर यांचे घर पाण्यात चारी बाजूने घेरले होते. तसेच खारेपाटण परिसरातील जैनवाडी, कालभैरवाडी, कपिलेश्वरवाडी, गुरववाडी, बाजारपेठ, चर्मकारवाडी, काझीवाडी, बंदरवाडी, भैरीआळी, पंचशीलनगर, हनुमाननगर आदी परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला.
खारेपाटणमध्ये पूर आल्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण उपसरपंच संदेश धुमाळे, ग्रामसेवक गिरीश धुमाळे, पोलिस पाटील बाळा शेट्ये, तलाठी रमाकांत डगरे यांनी पुराची पाहणी केली. मात्र वरीष्ठ पातळीवरील कोणीही अधिकारी आतापर्यंत पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले नाहीत.
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली मात्र स्वसंरक्षणाची साधने, व साहित्य नागरीकांना किंवा ग्रामपंचायत कार्यालयांना पुरविण्यात आलेली नाहीत. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रात्री उशिरा खारेपाटणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले. या पावसामुळे शेती जलमय झाली आहे तर परिसरातील काही भागातील रस्त्यावर पाणी आले आहे. (वार्ताहर)
मच्छिमार्केट बाजारपेठेत पाणी घुसले
घोडेबाजार बंदर रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बंदरवाडी (मुस्लिम वस्तीचा) संपर्क तुटला तर जैनवाडी यादेखील वस्तीच्या बाजूने पाणी घुसल्याने नागरिकांनी जैनमंदिरांचा आसरा घेतला. खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बसस्थानक रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला. खारेपाटणमधून वाहणाऱ्या शुकनदीने आपले पात्र बदलल्याने पुराचे पाणी पूर्णत: खारेपाटण शहरात घुसले. यामुळे खारेपाटण मच्छिमार्केट पाण्याखाली गेले. तसेच बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पाणी घुसले.