लाटांचा आस्वाद युवतीच्या अंगाशी
By admin | Published: June 12, 2016 11:38 PM2016-06-12T23:38:18+5:302016-06-13T00:14:23+5:30
नातेवाइकांनी वाचविले : मालवण रॉक गार्डन येथील थरार
मालवण : शहरातील रॉक गार्डन येथील खडकांवर आदळणाऱ्या अजस्र लाटांचा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. समुद्रात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर उधाणसदृश स्थिती निर्माण झाल्याने उसळत्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.
मालवण रॉक गार्डनजवळ खडकाळ भागात उंच उसळणाऱ्या लाटांचा आस्वाद घेत असताना एक पर्यटक युवतीला मोठ्या लाटांचा तडाखा बसला. या लाटाचा आस्वाद घेणे या युवतीच्या चांगलेच अंगलट आले आहे. लाटेच्या वेगात ती खडकावर आदळली.
खडकावरून समुद्रात कोसळण्याच्या स्थितीत असताना तिचे नातेवाईक व पर्यटकांनी त्या युवतीला वाचविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
समुद्रकाठी फेसाळणाऱ्या लाटांचा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक किनाऱ्यांवर गर्दी करीत आहेत. मालवण शहरात सर्वाधिक गर्दी रॉक गार्डन येथे असल्याचे दिसून आले आहे. मालवणात पावसाचा जोर कायम असून ६० मि.मी. पावसासह १ जूनपासून मालवणात ४५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बहरात आले आहे. मालवणात पावसाचा जोर कायम असून ६० मि.मी. पावसासह १ जूनपासून मालवणात ४५१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अतिउत्साही पर्यटकांना रोखणार कोण ?
पर्यटन हंगाम संपला असला तरी पावसाळी पर्यटन जिल्ह्यात उदयास येत आहे. पर्यटकांची संख्याही १ जूनपासून लक्षणीय आहे. पावसाळ्यात समुद्रात उधाणसदृश लाटा असल्याने १ जून ते ३१ जुलै या कालवधीत मासेमारी बंदी कालावधी असतो. तसेच किनाऱ्यालगत पर्यटकांनी पाण्याशी खेळू नये. जेणेकरून आपल्या जिवाचे बरेवाईट होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळी हंगामात किनारपट्टी भागात समुद्रात जाण्यास मनाई असते.
यावर कानाडोळा न करता शासनाचा नियम पाळणे आवश्यक आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना इतर नागरिक व स्थानिक लोकांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. पावसाळ्यात समुद्रस्नानाचा आनंद घेऊ नये. खोल समुद्रात जाणे टाळणे आवश्यक आहे. मात्र पालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.