शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यावर भर देणार
By admin | Published: November 23, 2015 11:22 PM2015-11-23T23:22:21+5:302015-11-24T00:29:36+5:30
मातीशी व शेतकऱ्यांशी खरी बांधिलकी - कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य
विद्यापीठाचा मूळ गाभा शिक्षण असले तरीही आमची बांधिलकी या मातीशी आहे. या भूमीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व या भागातील शेतकऱ्याला सधन करणाऱ्यासाठी आम्ही बांधील आहोत. शेतकऱ्यांचे हित जोपासून शेतीचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या मातीशी व शेतकऱ्यांशी आमची खरी बांधिलकी आहे. त्यादृष्टीने माझे प्रयत्न राहणार आहेत. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण या दोन्ही भागातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर अनुकंपा खालील लोकांना नोकरीत सामावून घेणे आमचे कर्तव्य होते. संकट काळात त्यांच्या कुटुंबाला याची खरी गरज असते. त्यावेळी त्यांना विद्यापीठाकडून सहकार्य मिळाले नाही तर त्यांच्या कुटुंबावर संकट येऊ शकते. ज्या विद्यापीठात त्यांनी काम केले, त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे आपले कर्तव्य मानून आपण यातील १७ उमेदवारांना अनुकंपाखाली नोकरीत सामावून घेतले आहे. याठिकाणी काम करताना कर्मचाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल.
कृषी विद्यापीठाचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षण आहे. कृषी विद्यापीठात किती चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते यावर पुढील पिढीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे स्पर्धात्मक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुढील काळात शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यात भरीव योगदान देण्यात येईल. त्यांच्या कार्याविषयी दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : कृ षी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून सूत्र घेतल्यानंतर तुमच्या समोर कोणत्या समस्या आल्या व त्या कशा सोडविणार आहात?
उत्तर : कृ षी विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या वर्षभरात विद्यापीठाची अनेक कामे रेंगाळल्याचे दिसून आले. तत्कालीन कुलगुरु डॉ. किसन लवांडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या विद्यापीठाचा पदभार परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांचेकडे सोपविण्यात आला. परंतु, या काळात विद्यापीठ कामाला फारशी गती मिळाली नाही. दापोली व परभणी हे खूप दूरचे अंतर असल्यामुळे प्रॅक्टिकली दोन्ही ठिकाणचा पदभार सांभाळणे फार कठीण होते. त्यामुळे विद्यापीठस्तरावरील अनेक कामे पेंडींग होती. कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कुलगुरुंना पुरेसा अवधी हवा असतो. परंतु, यासाठी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांना फारसा वेळ मिळाला नसावा. त्यामुळे शिक्षण विस्तार व संशोधन कार्याला फारशी गती मिळाली नाही. विद्यापीठस्तरावरील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. गेल्या वर्षभरात विद्यापीठातील पेंडींग कामांना प्राधान्य देऊन ही कामे सर्वप्रथम केली जाणार आहेत. दररोजच्या कामाबरोबरच पेंडींग कामावर जोर देऊन विद्यापीठाच्या कामकाजाला गती दिली जाईल.
प्रश्न : विद्यापीठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणत्या कामाकडे अधिक लक्ष देणार आहात?
उत्तर : विद्यापीठाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम शिक्षणातील समस्या जाणून घेण्यासाठी विद्यापीठ वसतीगृहाला भेट दिली. शिक्षण हा मूळ गाभा असल्याने कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही जबाबदारी विद्यापीठाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासाठी विद्यापीठातील वसतीगृहाला भेटी दिल्या. या भेटीतून विद्यार्थ्यांच्या मुलभूत गरजांमध्ये काही उणीवा असल्याचे प्रकर्षाने जाणवले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय व जागतिक स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी तशा प्रकारचे शिक्षण विद्यापीठात मिळणे गरजेचे आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे. परंतु, त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना घडविणे गरजेचे आहे. परंतु, विद्यापीठाकडून तसे होताना दिसत नाही. बहुतांशी विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी असल्याने विद्यार्थी अजूनही मराठीतच बोलताना आढळले. मातृभाषेत बोलणे हा गुन्हा नव्हे परंतु, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी हे आलेच पाहिजे. अजूनही विद्यार्थी बोलण्यासाठी लाजतात, घाबरतात. त्यांच्या मनामध्ये भीती आहे. त्यांच्यात क्षमता आहे मात्र ते दिशाहीन बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. या विद्यापीठाचे, राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी येथे घडवले जातील. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ निर्माण करण्यावर भर दिला जाईल. विद्यापीठ कॅम्पस, वसतीगृह कॅम्पस, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असे बनवण्यात येईल. त्या दृष्टीने आपण विद्यापीठाच्या शैक्षणिक बाबींबाबत गांभीर्याने लक्ष देणार आहोत. योग्य शिक्षणातूनच भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल बनणार आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मी करणार आहे.
प्रश्न : शेतकऱ्याचे समाधान कसे कराल, शेतीपुढील आव्हाने कशी सोडवाल?
उत्तर : नैसर्गिक बदलामुळे शेतीपुढे काही आव्हानेसुद्धा आहेत. परंतु, त्यावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठातर्फे प्रयत्न केले जातील. कोकणात भातशेती, आंबा, काजू, मत्स्यशेती हे मुख्य व्यवसाय आहेत. कोकणातील शेतकरी सधन होण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन बारमाही शेती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करुन केवळ एका पिकावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यापुढे विविध पिकांचे पर्याय देण्यात येतील. उत्तर कोकणातील शेतकऱ्याचं स्थलांतर रोखण्यासाठी कॅशक्रॉप देणारी पिके घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. उत्तर कोकणातील बहुतांशी भागात लोकसंख्येची वाढ झाल्याने या भागातील शेतीखालील क्षेत्र घटत आहे. शहरीकरणामुळे येथील लोकांचे स्थलांतर ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या कमी शेतीत अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर या उत्तर कोकणातील वाढत्या समस्यांचा विचार करुन त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल. उत्तर कोकणातील वाढत्या शहरीकरणामुळे दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला, शेती याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिल्यास त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल.
प्रश्न : विस्तार कार्यातील उणीवा कशा दूर कराल?
उत्तर : कृषी विद्यापीठ लोकाभिमुख करण्यात विस्तार कार्याचा मोठा वाटा असतो. कृ षी विद्यापीठाने विकसीत केलेले अत्याधुनिक संशोधन, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, त्याचा प्रसार व प्रचार करण्याचे मुख्य काम विस्तार विभागाचे आहे. विद्यापीठ व शेतकरी यांच्यातील मुख्य दुवा असणारे हा विभाग सक्षम करणे ही माझी जबाबदारी आहे. कृृषी विस्तार छोट्या - छोट्या गोष्टीतून साधता येतो. एका शेतकऱ्याच्या शेतावर प्रयोग करुन इतर शेतकऱ्यांना यासाठी प्रात्साहीत करणे गरजेचे आहे. विद्यापीठातील पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर प्रात्यक्षिके घेऊन त्या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. शेतकऱ्यांच्याच शेतात कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येईल.
प्रश्न : कर्मचारी हीत कसे जोपासाल?
उत्तर : कोणतीही संस्था त्यामधील कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन तसेच समन्वयातून काम केले जाईल. या विद्यापीठाच्या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचे मोलाचे योगदान आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळेच विद्यापीठाचा देशात नावलौकिक आहे. विद्यापीठाचे काम खूप आहे. परंतु, याला प्रसिद्धी व वरिष्ठांची सा फारशी मिळाली नाही. यापुढे आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून विद्यापीठाला नावलौकिक मिळवून देऊ.
- शिवाजी गोरे