आॅनलाईन बदल्या, शिक्षकांनी उपोषण करत वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:53 AM2019-02-28T11:53:23+5:302019-02-28T11:55:35+5:30
आॅनलाईन बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या १७९ शिक्षकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे उपोषण छेडले. आंतरजिल्हा बदली शिक्षक कार्यमुक्त होऊन जाईपर्यंत आम्हाला आमच्या सध्याच्या शाळेत काम करण्याची संधी द्यावी व आंतरजिल्हा बदलीने शिक्षक कार्यमुक्त होवून गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदावर आमची पदस्थापना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांनी उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी : आॅनलाईन बदल्यांमध्ये विस्थापित झालेल्या १७९ शिक्षकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे उपोषण छेडले. आंतरजिल्हा बदली शिक्षक कार्यमुक्त होऊन जाईपर्यंत आम्हाला आमच्या सध्याच्या शाळेत काम करण्याची संधी द्यावी व आंतरजिल्हा बदलीने शिक्षक कार्यमुक्त होवून गेल्यानंतर रिक्त होणाऱ्या पदावर आमची पदस्थापना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांनी उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आॅनलाईन बदल्या करताना या जिल्हयातील १७९ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. यामध्ये तब्बल १३२ शिक्षिकांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य शिक्षिकांची मुले १ ते ३ वयोगटातील आहेत. या विस्थापित झालेल्या शिक्षकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार २३ फेब्रुवारी पर्यंत टप्पा क्रमांक ५ साठी त्यांनी परत आॅनलाईन बदल्यासाठी रिक्त असलेल्या शाळा मागितल्या आहेत.
रिक्त दिसत असलेल्या बहुसंख्य शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. या शिक्षिकांना जर दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळेत जाण्याची वेळ आली तर त्यांचे प्रपंच विस्थापित होणार आहेत. महिला शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
रिक्त पदांवर नियुक्ती द्यावी
शासनाचे महिलां कर्मचा-यां बाबतचे धोरण सहानभूतीचे आहे. मात्र आॅनलाईन बदल्या करताना या धोरणाला छेद देण्यात आला आहे. यामुळे पती-पत्नी एकत्रीकरणाला बाधा पोहचलेली आहे. त्यामुळे या समस्येचे समाधान होण्यासाठी या जिल्हा परिषद कडील ज्या १६३ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या आहेत. त्या शाळेतील ती पदे रिक्त दाखवून त्या रिक्त पदावर आम्हास नियुक्ती द्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यावेळी अस्मिता कुडाळकर, चैत्राली पाटील, दिपश्री सावंत, स्वाती देसाई, सायली आटक यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते.