धुक्यात हरवला सिंधुदुर्ग; आंबा, काजू फळांना बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 10:38 AM2021-12-25T10:38:13+5:302021-12-25T10:39:29+5:30
ले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणार्या सिंधुदुर्गकरांची शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली.
सिंधुदुर्ग : गेले आठवडाभर कडाक्याची थंडी अनुभवणाऱ्या सिंधुदुर्गकरांची शनिवारची पहाट दाट धुक्याची दुलई घेऊनच उगवली. सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या या धुक्यात रिमझिम पडणाऱ्या पावसासारखे दव अंगावर झेलतच अनेकांनी धुक्यातून भटकंतीचा अनुभव घेतला. वीस फुटाच्या अंतरावरील स्पष्ट दिसत नव्हते. इतके धुके दाट होते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन होत नव्हते. तोपर्यंत अवघी सृष्टी दवांनी चिंब झाली होती. साधारणपणे आॉक्टोबर महिन्यापासूनच धुक्याचे आगमन होते. पण यावर्षी पावसाळाच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबल्याने किरकोळ एक दिवसाचा अपवाद वगळता दाट असे धुके पडलेच नव्हते.
शुक्रवारी मात्र अचानक धुक्याने एंट्री केली. शनिवारी यापेक्षा दाट धुके पडले. सलग दुसऱ्या दिवशी धुक्याचा आनंद घेण्यासाठी हौशी नागरिकांनी पाणवठे गाठले. सावंतवाडी शहरातील मोती तलावकाठी धुक्याचे विलोभनीय दर्शन होत होते.
आंबा मोहोर गळणार
- या धुक्याने आंबा, काजू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवडाभर पडत असलेल्या थंडीमुळे आंबा, काजू पिकाला पोषक वातावरण होते. उरलेला सुरलेला आंबा मोहोरायला सुरूवात झाली होती. मात्र, आता गेले दोन दिवस पडत असलेल्या धुक्यामुळे आंबा, काजू मोहोर धुक्याने जळून जाणार आहे.
- यासाठी काही खबरदारी घेण्याचे आवाहन मुळदे कृषी संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार बागेत रात्रीच धुर करावा. जेणेकरून उष्णता राहून मोहरगळ कमी होईल.
वाहने लाईट लावूनच
- धुक्याची तीव्रता जास्त असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.
- फॉग लॅम्पबरोबरच हेड लाइट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. अशी धुक्याची दाट पसरली होती.
- नदीजवळ, ओहोळ, तलावाजवळ तर धुके इतके होते की पाच फुटांवरचेही स्पष्ट दिसत नव्हते.