कोकणातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा
By admin | Published: September 20, 2015 12:11 AM2015-09-20T00:11:33+5:302015-09-20T00:13:19+5:30
विनोद तावडे : सिंधुदुर्गनगरीत शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या सर्व विभागांत रिक्त पदांमुळे शासकीय योजना राबविताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाकडे विशेष बाब म्हणून कोकणातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांसह सर्व विभागांचे विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या विभागात मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करावी. तसेच जिल्ह्यात ज्या विभागांचे शासनाकडे मंत्रालय स्तरावर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत व अद्यापपर्यंत ते मंजूर झाले नाहीत असे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाने अशा प्रलंबित प्रस्तावांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. (प्रतिनिधी)
यंत्रणा प्रभावीपणे राबवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत.
आरोग्य विभागाने साथींच्या कालावधीत अतिरिक्त डॉक्टरांची सेवा मागणी करावी, जेणेकरून जिल्ह्यातील जनतेचे आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मंत्री विनोद तावडे म्हणाले.
स्वाइन फ्लू अथवा लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच प्रभावीपणे यंत्रणा राबविण्याचे आदेशही दिले.
नुकसानभरपाई वस्तुस्थितीदर्शक असावी
नुकसानभरपाई रकमेचे वाटप शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहीत कालावधीत करण्यात यावे; वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना देण्यात येणारेनुकसानभरपाईचे प्रस्ताव वस्तुस्थितीला धरून सादर करावेत, अशा सूचना तावडे यांनी दिल्या.