Gram Panchayat Election: आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, कणकवलीच्या तहसीलदारांनी केल्या सूचना
By सुधीर राणे | Published: November 15, 2022 02:05 PM2022-11-15T14:05:08+5:302022-11-15T14:23:30+5:30
कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नाहीत
कणकवली : कणकवली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी. अशा सूचना कणकवलीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पवार यांनी दिल्या.
कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आढावा बैठक तहसीलदार दालनात आज, मंगळवारी पार पडली यावेळी निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, निवडणूक सहायक मयुरी चोपडे आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता लागू असताना जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामांची भूमिपूजने करता येतील का? अशी विचारणा केली. त्यावर कोणत्याही विकास कामांची भूमिपूजन करता येणार नसल्याचे तहसीलदार पवार यांनी स्पष्ट केले. तंटामुक्त समिती बैठक निवडणूक कालावधीत होऊ नये. तसे पत्र संबंधित लोकांना देण्यात यावे. अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
निवडणूक नोटीस १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे. १८ ते २३ डिसेंबर निवडणूक आचारसंहीता कालावधी आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था आहे. ५८ ग्रामपंचायतीसाठी १८८ ठिकाणी मतदान केंद्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार पवार यांनी केले.