टस्कराकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग

By admin | Published: May 11, 2016 11:30 PM2016-05-11T23:30:11+5:302016-05-11T23:54:46+5:30

वीस मिनिटे थरार : दोडामार्ग तालुक्यातील बाबरवाडी येथील प्रकार; शेतकरीही टार्गेट

Followers of Tuscara | टस्कराकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग

टस्कराकडून वनकर्मचाऱ्यांचा पाठलाग

Next

दोडामार्ग : तालुक्यातील बाबरवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जंगली टस्करामुळे दहशतीचे वातावरण असताना याच टस्कराने बाबरवाडीत गस्तीवर असलेल्या वन कर्मचारी तसेच शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बचावले. पाठीमागे लागलेला टस्कर आणि जिवाच्या आकांताने सैरावैरा पळणारा माणसातील हा थरारक संघर्ष अंगावर काटा उभा करणारा ठरला. जवळपास २० मिनिटे सुरू असणाऱ्या या संघर्षाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी वनपाल दत्ताराम देसाई, वनसंरक्षक विश्राम कुबल गस्त घालत होते. बाबरवाडीतील विष्णू सीताराम सडेकर यांच्या शेतमांगरात ते थांबलेहोते. त्यांच्यासोबत सडेकर, रामराव लोंढे, आदी शेतकरी उपस्थित होते. अचानक टस्कराचे त्या ठिकाणी आगमन झाले. समोर माणसांना बघून बिथरलेल्या टस्कराने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने चाल केली.
टस्कर आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी जीव मुठीत धरून पळण्यास सुरुवात केली. टस्कर त्यांच्या पाठीमागून धावत होता. वनरक्षक कुबल यांनी प्रसंगावधान राखत टस्कराच्या दिशेने अ‍ॅटमबॉम्ब पेटवून फेकला. त्यामुळे टस्कराने वनकर्मचाऱ्यांचाही ]+

पाठलाग सुरू केला. जवळपास वीस मिनिटे हा थरार सुरू हाता. टस्कराला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही दिवसांपासून बाबरवाडी व बोरयेवाडी परिसरात जंगली हत्तींचा कळप फिरत आहे. या कळपाने वायंगणी भातशेती, फणस, केळी व माडबागायतींचे अतोनात नुकसान केले आहे. एवढेच नव्हे, तर लोकवस्तीपर्यंत हा कळप येऊन पोहोचला आहे. यातील टस्कर आक्रमक झाला असून, सायंकाळी तो लोकवस्तीत येतो. बाबरवाडीच्या मुख्य रस्त्यावरून त्यांची ये-जा असते. या हत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तींचा उपद्रव शेतकऱ्यांना होऊ नये, यासाठी वनकर्मचारीही गस्त घालतात. (प्रतिनिधी)

Web Title: Followers of Tuscara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.