पिण्याच्या पाण्यासाठी फोंडावासीयांनी केला निर्धार,ग्रामस्थांची नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:35 AM2019-06-03T11:35:04+5:302019-06-03T11:37:06+5:30
लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.
फोंडाघाट : लोरे तलावातील पाण्याच्या साठवणीची दैनावस्था याबाबतची खरी वस्तुस्थिती लोकमतमधून प्रसिद्ध होताच याची फोंडा येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांनी त्वरित दखल घेतली. एक दिवस गावासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी या घोषणेसह सर्व ग्रामस्थांनी तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्धार केला.
यासाठी नियोजनाची बैठक श्री देव राधाकृष्ण मंदिरात मोठ्या उपस्थितीत पार पडली. बुधवार ५ जून रोजी सर्व ग्रामस्थ व बंधूभगिनींच्या उपस्थितीत संपूर्ण दिवसभर गाळ उपशाचा शुभारंभ करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
यावेळी कणकवली तालुका सभापती सुजाता हळदिवे, जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, सरपंच संतोष आंग्रे, हेल्थ अॅकॅडमीचे महेश सावत, राजू पटेल, संदेश पटेल, कुमार नाडकर्णी, भालचंद्र राणे, सुंदर पारकर, संजय नेरूरकर, सचिन नाकाडी, सचिन भोगले, विशाल रेवडेकर, बाळा पारकर, पप्या सावंत, समीर मांगले, प्रथमेश रेवडेकर, अजित नाडकर्णी, एकनाथ कातरूड, विश्वनाथ जाधव, हर्षल तेंडुलकर, भाई गुरव, संतोष पारकर, संजय पटेल, मोहन पारकर, राजेश शिरोडकर, अवी चाचुर्डे, सुभाष मर्ये, महेश पेडणेकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ठेकेदारांनी आपले जेसीबी, सुमारे दहा डंपर-ट्रॅक्टर तसेच उपस्थितांसाठी नाश्ता, जेवणाची सोय, सरपंच, गावातील टपरीवाले, हॉटेलवाले यांनी स्वखर्चाने उत्स्फूर्तपणे देण्याचे कबूल करून मानवतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. आरोग्य विभागाने प्रथमोपचार टीम उपस्थित ठेवण्याचे मान्य केले.
यावेळी सर्वांनीच हे काम एक दिवसांत पूर्ण होणार नाही याची कल्पना आहे. मात्र, त्या निमित्ताने जनजागृतीतून गाव एकत्र येईल आणि एका रात्रीत काही वर्षांपूर्वी वाघोबाच्या मंदिर बांधणीची पुनरावृत्ती होईल. चांगले कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र पुढील वर्षी नाम फाऊंडेशन अथवा केंद्राची गाळमुक्त तलाव-शिवार योजनेच्या प्रस्तावाद्वारे संपूर्ण तलाव गाळमुक्त करण्याचे अभिवचन जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे यांनी ग्रामस्थांना दिले.
घोणसरी-देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ३, ४ ग्रामस्थांनी त्यांच्या योग्य तक्रारीसाठी दावा दाखल करून अडविल्याने सोडलेले पाणी मध्यंतरी अडविले जाते. तो पेच प्रशासनाने सोडविल्यास धरणाचे पाणी थेट गांगोवाडीपर्यंत आणि उगवाई नदीमधून, कोंडयेपर्यंत पोहोचू शकेल.
पर्यायाने कधी पाणी टंचाई उद्भवणार नाही. त्यासाठी तक्रारदारांना ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटले. तुमच्या दाव्यासाठी गाव तुमच्याबरोबर आहे. मात्र, काम अडवून गावाला वेठीस धरू नका अशी विनंती समस्त ग्रामस्थांनी केली. शेवटी ग्राम सहभागातून होणारे हे गाळ उपशाचे काम संपूर्ण जिल्ह्याला मार्गदर्शन ठरेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. सर्वांच्या सहभागातून काम करण्याचा निर्धार केला.
एक दिवस गावासाठी ग्रामस्थांनी दिली हाक
तलावातील अपुरा पाणीसाठा, गावच्या नळयोजनेपुढील संकट लक्षात घेता संपूर्ण गावातील अबालवृद्ध, बचतगटांतील महिला भगिनी, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांनी एकमुखाने बुधवार ५ जून लोरे येथील तलाव परिसरात उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. या दिवशी एक दिवस गावासाठी देताना ह्यसाथी हाथ बढाना... या प्रकारे तलावातील गाळ उपसा करण्याची ग्वाही दिली.