Sindhudurga: सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
By अनंत खं.जाधव | Published: March 8, 2024 12:53 PM2024-03-08T12:53:18+5:302024-03-08T12:54:15+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. ...
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ४३ विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर तेथेच उपचार करण्यात येतील असे आरोग्य केंद्रातून सांगण्यात येत आहे.
दरम्यान मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाब सुरू झाल्याने येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ यांनी स्पष्ट केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 43 मुला मुलींना पहाटे तीन वाजल्यापासून झुलाब व उलटी सुरू झाली. नवोदय विद्यालय प्रशासनाकडून तातडीने या विद्यार्थ्यांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यातील काही विद्यार्थी हे झुलाब व उलटी ने घायाळ झाले होते. त्यांना लागलीच उपचार देण्यात आले आहेत. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी रूग्णालयात दाखल होत विद्यार्थ्यांना धीर दिला.
गुरूवारी रात्रीचे जेवण विद्यार्थ्यानी मेसमध्ये घेतले त्यानंतर ते झोपी गेले होते. त्यातच पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक कारण चौकशीत पुढे आले आहे. जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावर सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत, असे शिक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून विद्यार्थ्यांना अधिक उपचार हवे असल्यास सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.