सैन्य भरतीमुळे खाद्यपदार्थ महाग
By admin | Published: February 11, 2015 10:46 PM2015-02-11T22:46:03+5:302015-02-11T22:46:03+5:30
सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणी
रत्नागिरी : सैन्य भरतीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची गर्दी अधिक असल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. केळी ५० रूपये डझन, तर वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत होता.
सैन्य भरतीसाठी परजिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थी येत आहेत. मध्यरात्रीपासून भरती प्रक्रियेसाठी विविध प्रात्यक्षिकांना प्रारंभ होत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मंडळी एक दिवस आधीच शहरात दाखल होत आहेत. येताना एकदिवसाचा जेवणाचा डबा घेऊन मंडळी आली असली तरी खाद्य पदार्थाचा आस्वाद घ्यावा लागतो.
सैन्यभरती वेळी नाश्त्याची सुविधा असली तरी बाहेर पडल्यानंतर वडापाव, सामोसा, केळी, कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत. हॉटेल्समध्येसुध्दा जेवणाकरिता गर्दी होत आहे. मात्र, सामान्य परिस्थिती असलेली मंडळी येताना घरचा डबा घेऊन येत आहेत. त्यामुळे जेमतेम पैशात मिळेल त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. कलिंगडाचे थंडगार काप असलेली डीश १० रूपये दराने विकण्यात येत आहे. ३० ते ४० रूपये डझन असणारी केळी ५० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. १० रूपयांना मिळणारा वडापाव १२ ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. समोसासुध्दा १२ ते १५ रूपयांना विकण्यात येत आहे. सायंकाळच्या वेळेत बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थ संपत असल्याने विद्यार्थ्यांना फळांचा आस्वाद घ्यावा लागत आहे.१० ते १५ रूपये दराने विकण्यात येणारा मोसंबीचा रस १५ ते २० रूपये दराने विकण्यात येत होता. रत्नागिरी शहरातील बहुतांश खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने ९ वाजेपर्यंत बंद होत असल्याने उमेदवार आधीच खरेदी करून ठेवत आहेत. खाद्यपदार्थ खाऊन रॅपर्स, पिशव्या, कागद तसेच केळ्यांच्या साली रस्त्यावरच टाकून देण्यात येत असल्यामुळे मारूती मंदिर परिसरात सध्या गर्दीबरोबर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पालिकेने पिण्याच्या पाण्याचा टँकर स्टेडियमवर तैनात केला असला तरी मारूती मंदिर परिसरातील नळावर, बागेतील नळावर पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी गर्दी होत आहे. याशिवाय पाण्याच्या बाटल्यांनाही मागणी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
सैन्यभरती; उमेदवारांच्या निवासव्यवस्थेची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरीत सुरु असलेल्या सैन्यभरतीसाठी विविध जिल्ह्यातील हजारो तरुण येत आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था तत्काळ करावी, अशा आशयाचे निवेदन येथील समविचारी मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
पहाटे तीन वाजल्यापासून भरती सुरु होत असल्याने, या तरुणांना भरतीच्या आदल्या दिवशीच यावे लागते. कोणतीही निवास व्यवस्था नसल्याने त्यांना थंडीच्या दिवसात उघड्यावर थांबावे लागत आहे. सार्वजनिक शौचालयाचा अभाव असल्याने शहर आणि परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर या उमेदवारांची आबाळही होत आहे.
रत्नागिरी शहरातील महाविद्यालयानजीकच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि पालिकेच्या शाळा यामध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. त्यामध्ये या तरुणांची व्यवस्था होऊ शकते. प्रशासनाने शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने या तरुणांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावावा व या भावी सैनिकांची परवड थांबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन समविचारी मंचाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात अशोक वाडेकर, छोटू खामकर, संजय नागवेकर, दिलीप नागवेकर, राजू चव्हाण यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)