सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का 

By अनंत खं.जाधव | Published: October 11, 2024 12:24 PM2024-10-11T12:24:34+5:302024-10-11T12:26:04+5:30

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत वाघाचे अस्तित्व

For the first time eight tigers were recorded in the forest of Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का 

अनंत जाधव

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र शासनाने सह्याद्री कोकण कॉरिडॉरची घोषणा केल्यानंतर आता वन्य प्राण्यांनाही सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसर सुरक्षित वाटू लागला आहे. सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ दिसून आले आहेत.

सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.

जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली. यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. २०१४ च्या जनगणनेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्यावर आली होती. मात्र, आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गोवा, कर्नाटक, राधानगरी अभयारण्यापर्यंत प्रवास

दोडामार्ग तालुक्याला लागूनच कर्नाटक तसेच गोव्याचे जंगल आहे. मात्र, वाघांना सिंधुदुर्गचे जंगल अधिक सुरक्षित वाटत असल्याने अनेकवेळा हे वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहेत. वनअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे वाघ जरी सिंधुदुर्गमधील कॅमेऱ्यांत ट्रॅप झाले असले, तरी गोवा, कर्नाटक तसेच राधानगरी अभयारण्यापर्यंत यांचा प्रवास सुरूच असतो.

वाघांची संख्या वाढल्याने आता त्यांचा सुरक्षित अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. दिवस-रात्र जंगलात पेट्रोलिंग तसेच कॅमेऱ्यातून नजर ठेवणे, सीमा परिसरात नजर ठेवणे आदी कामे हाती घेतले आहेत. - नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

Web Title: For the first time eight tigers were recorded in the forest of Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.