कारवाईस भाग पाडणार
By admin | Published: May 30, 2014 12:56 AM2014-05-30T00:56:22+5:302014-05-30T01:03:54+5:30
प्रमोद जठार : ‘त्या’ तेल प्रदूषणाबाबत अधिवेशनात लक्षवेधी
देवगड : देवगडसह गोव्यातील विविध समुद्रकिनार्यावर टाकाऊ तेलाच्या जाड व चिकट तवंगामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येची दखल देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार प्रमोद जठार यांनी घेतली आहे. या प्रश्नाबाबत आगामी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला कारवाईसाठी भाग पाडू अशीही भूमिका त्यांनी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात स्पष्ट केली. दरम्यान, या सर्व प्रकरणामागे प्रतिभा शिपिंगच्या ‘प्रतिभा भीमा’ या जहाजावरील टाकाऊ तेल साठा व त्याबाबत संशयास्पद भूमिका घेणारे मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत आहे. देवगड किनार्यावर दिसून आलेल्या डांबरसदृश चिकट काळ्या द्रवाचे थर अशाचप्रकारे मार्मागोवामधील बायणा व पेडणेमधील मोर्जिस समुद्रकिनार्यावरही दिसून आल्याने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. दरम्यान, तेलसाठ्यासह जुन्या एम टी प्रतिभा भीमा जहाजाचे समुद्रात नेले जाणे धोकादायक ठरले व त्यावरील तेलसाठा हिंदकाळून किंवा अन्य मार्गाने समुद्रातच सोडून दिला असल्याची दाट शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामुळे या सर्व प्रकारास व प्रदूषणास आॅटम हार्वेस्ट कंपनी व बंदर अधिकारी जबाबदार असल्याचे आरोपही होत आहेत. समुद्र किनार्यावर प्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी यानिमित्ताने होत आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने गेले दोन दिवस या प्रकाराबाबत जनजागृती केल्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)