बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 05:26 PM2020-02-27T17:26:44+5:302020-02-27T17:27:59+5:30
पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
बांदा : पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशीआरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
पत्नीची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली असतानाही पैशांचे आमिष दाखवून कुटुंबीयांना अंधारात ठेवत प्रशांत यांची बळजबरी नसबंदी करण्यात आली. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांची पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी बांदा पोलिसांत दिला आहे.
पाडलोस येथील प्रशांत नाईक हे बाधकांम काम व मोलमजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व दोन अनोळखी व्यक्ती यांनी प्रशांतला भेटून नसबंदीसंबंधी माहिती दिली. त्यानंतर प्रशांतला नसबंदी केल्यानंतर ४० हजार रुपये बँक खात्यात जमा होतील असे खोटे सांगितले. प्रशांतची खात्री होण्यासाठी केंद्राचे कर्मचारी यांनी नाईक यांच्या घरी जात बँक पासबुक व आधारकार्ड यांची झेरॉक्स प्रत घेतली. यावेळी पत्नीने यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली. बांधकाम केलेल्या मजुरीचे पैसे जमा करण्यासाठी कागदपत्रांची गरज असल्याचे सांगून नसबंदी शस्त्रक्रियेबाबत त्यांनी पत्नीला पूर्णपणे अंधारात ठेवले.
तिघाही संशयितांनी प्रशांतला प्रथम मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले. काही कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेऊन त्याला थेट शासकीय रुग्णवाहिकेतून कणकवली येथील खासगी दवाखान्यात नेले. शस्त्रक्रिया बिनटाक्याची न करता टाके घालून करण्यात आली. प्रचंड दुखापत व असह्य वेदना असतानाही सायंकाळी प्रशांतला त्यांना दांडेली-आरोस बाजार येथे बाजारपेठेत सोडून तिघांनी तेथून पलायन केले. यावेळी प्रशांतला घरी सोडण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही.
त्याचवेळी आपण फसलो गेल्याचे प्रशांत यांच्या लक्षात आले. मात्र, त्यांनी याची घरच्यांना कल्पना दिली नाही. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणावेळी रक्तस्राव होत असल्याचे प्रशांतची पत्नी प्रतीक्षा हिच्या लक्षात आले. अधिक विचारपूस केली असता प्रशांतने पत्नी व भावाला झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.
प्रशांत यांच्या पत्नीने बांदा पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशांत यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
आरोग्यकेंद्रात विचारला जाब
अज्ञानाचा फायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्यांचा भाऊ विश्वनाथ यांनी बांदा पोलिसांसमोर केला. त्या तिघांसह मळेवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कणकवली येथील खासगी दवाखान्याचे डॉक्टर या सर्वांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पाडलोस येथील तरुणावर हा अन्याय झालेला आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी किती टोकाला जाऊ शकतात हे यातून सिद्ध झाले. जिल्हा परिषद सदस्या तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्षा शर्वाणी गावकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत गुरूवारी मळेवाड आरोग्यकेंद्रात जाब विचारला जाईल.
- अक्रम खान, सरपंच बांदा