Sindhudurg: खवले मांजर विक्रीचा प्रयत्न, एका अल्पवयीनासह पाच जण ताब्यात
By सुधीर राणे | Published: December 2, 2024 12:11 PM2024-12-02T12:11:26+5:302024-12-02T12:12:26+5:30
वारगाव येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई; खवले मांजरासह गाडी ताब्यात
कणकवली : कणकवली तालुक्यातील वारगाव येथील खवले मांजराची तस्करी करून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच एक खवले मांजर व महिंद्रा पिकअप गाडीही त्या संशयित आरोपींकडून ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई काल, रविवारी करण्यात आली.
या ताब्यात घेण्यात आलेल्या चार संशयित आरोपींची नावे विशाल विष्णु खाडये (३४,रा.लोरे नं. १, ता. कणकवली), संदीप तानाजी घाडी (४४, रा. मुटाट ता. देवगड ), गिरिधर लवू घाडी (४१, रा. मुटाट, ता. देवगड), गुरुनाथ धोंडु घाडी (५०,रा. मुटाट ता. देवगड)व अशी आहेत. तर एक अल्पवयीन मुलगा आहे.
रविवारी दुपारी वनअधिकाऱ्यांना खवले मांजर विक्रीसाठी घेऊन काही लोक वारगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी व वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी सापळा रचला.
वनविभागाच्या पथकाला मुंबई -गोवा महामार्गावरील वारगाव येथील राजस्थानी ढाबा या ठिकाणी पाच आरोपी एक महिंद्रा पिक अप (क्रमांक एम. एच. ०७-एस-७०००) व एक वन्यप्राणी खवले मांजर मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशी अंती त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सावंतवाडी सचिन शिडतुरे, महेश पाटील, वनपाल सावळा कांबळे, सर्जेराव पाटील, धुळु कोळेकर, वनरक्षक प्रमोद जगताप, विष्णु नरळे, सचिन पाटील, सिध्दार्थ शिंदे, सुखदेव गळवे, ब्रम्हकुमार भोजने, कोमल करकुड, दीपाली पाटील व इतर वन कर्मचारी यांनी केली.