पक्षभेद विसरून दुष्टप्रवृत्ती विरोधात एकत्रितपणे लढा द्या, सुधीर सावंत यांचे आवाहन
By सुधीर राणे | Published: June 22, 2024 04:58 PM2024-06-22T16:58:17+5:302024-06-22T16:59:49+5:30
कणकवली येथे श्रीधरराव नाईक यांचा ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम
कणकवली: मारामारी, खून हा राजकारणाचा विषय नाही. राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे. श्रीधरराव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते. त्यांची हत्या करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती विरोधात केवळ वैभव नाईक, सुशांत नाईक यांचा लढा नाही. तर तो आपल्या सर्वांचा आहे. त्यासाठी सर्वानी पक्षभेद विसरून एकत्रितपणे लढा द्या असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.
श्रीधरराव नाईक यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त कणकवली येथे आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, नीलम सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुगंधा साटम, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, मुरलीधर नाईक, अरुण भोगले, संकेत नाईक आदी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, २२ जून हा दिवस आयुष्यात येऊच नये असे आम्हाला वाटते. श्रीधर नाईक यांचे कार्य युवापिढीला समजावे, युवा पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून समाजकार्यात पुढे यावे. त्यासाठी हा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रीधर नाईक हे रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते. त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांचे हे यश पचत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. ते चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करत असत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी वैभव नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक हे मेहनत घेत आहेत. जिल्ह्याच्या जडणघडणीत नाईक कुटूंबांचे मोठे योगदान आहे. राजकारणातील अडथळा दूर करण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली. सध्या राजकारणात सत्तेसाठी पैसे आणि पैशासाठी सत्ता हेच समीकरण चालू आहे. न्याय, मते आणि नेते देखील पैशाने विकत घेतले जात आहेत. जनतेने अशा प्रवृत्ती विरोधात लढले पाहिजे. अमित सामंत, इर्शाद शेख ,विवेक ताम्हणकर, संदीप सरवणकर, नीलम सावंत आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बाळू मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. तर संकेत नाईक यांनी आभार मानले.