तळेरे तालुका निर्मितीस संघटीत प्रयत्न आवश्यक

By admin | Published: March 15, 2015 09:54 PM2015-03-15T21:54:29+5:302015-03-16T00:15:23+5:30

मिलिंद कुलकर्णी : नियोजन बैठकीत मार्गदर्शन

The formation of Talare taluka requires organizational efforts | तळेरे तालुका निर्मितीस संघटीत प्रयत्न आवश्यक

तळेरे तालुका निर्मितीस संघटीत प्रयत्न आवश्यक

Next

नांदगाव : पक्ष वा राजकारण बाजूला ठेवून संघटीतपणे तळेरे तालुका निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. बैठकीमध्ये तरूणवर्गाचा पाठिंबा व सहभाग महत्त्वाचा दिसून येत आहे. भौगोलिक, सामाजिक व त्याअनुषंगाने सर्वच बाबतीत तळेरेचे महत्त्व अबाधित राहिले आहे, असे प्रतिपादन बैठकीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी तळेरे येथे केले. शनिवारी पार पडलेल्या तळेरे तालुका निर्मितीबाबतच्या बैठकीत ते बोलत होते.कुलकर्णी म्हणाले, तालुका निर्मिती करण्यासाठी आपल्या कामाची पद्धत ठरवली पाहिजे. त्यासाठी मुंबईसह स्थानिक पातळीवरही पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे. या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली. तसेच यावेळी नियोजित तळेरे तालुका कृती समिती, तळेरेची निवड करण्यात आली. तर या नवीन तळेरे तालुका निर्मितीसाठी लागणारी सर्व मदत व सहकार्य केले जाईल, असा पाठिंंबा उपस्थितांतून देण्यात आला.प्रारंभी सरपंच दर्शना बांदिवडेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरूवात झाली. उपसरपंच शशांक तळेरे यांनी या बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली. तळेरे तालुका निर्मितीबाबत चर्चा करण्यासाठी तळेरे ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायतीने आयोजित केली होती. यावेळी सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ उपस्थित होते. गेली अनेक वर्षे तळेरे तालुका निर्मितीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील एक विकसनशील शहर म्हणून तळेरे नावारूपास येत आहे.याठिकाणी शंभर वर्षांची ब्रिटीशकालीन बाजारपेठ आहे. वैद्यकीय सेवा, पोस्ट आॅफिस, राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन आॅफिस, एसटी स्टॅण्ड, शाळा, महाविद्यालये आदी सुखसोयी असणारे कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यांच्या सीमेवरील गावांना तालुकास्थळासाठी एक उत्तम पर्यायी शहर म्हणून तळेरे हे गाव ठरू शकते. देवगड, कणकवली व वैभववाडी या तीन तालुक्यांच्या सीमेवरील गावांना आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाण्यासाठीचे अंतर जास्त आहे. बाजारपेठ, बँका, एसटी स्टॅण्ड, पोस्ट आॅफिस, शाळा, महाविद्यालय, वाहतुकीच्या साधनांसाठी पेट्रोल, डिझेल यासाठी या नजिकच्या गावांना तळेरे हाच उत्तम पर्याय आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, महिला मंडळे, भजन मंडळे, बचतगट अशा विविध बाबतीत तळेरे गाव नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून येते. शिवाय, नियोजित तळेरे तालुक्यात विविध पर्यटनस्थळेही आहेत. जेणेकरून येथे पर्यटन वाढू शकेल. त्यामुळे तळेरे गाव तालुका म्हणून जाहीर झाला तर तळेरेसहीत नजिकच्या दशक्रोशीतील अनेक गावांना याचा फायदा होऊ शकतो, असा सूर उपस्थितांमधून रमाकांत वरूणकर, सूर्यकांत तळेकर, श्रीकांत डंबे, राजेश माळवदे, दादासाहेब महाडिक, उदय दुधवडकर, दिलीप तळेकर यांनी मांडलेल्या सूचनांतून निघाला. (वार्ताहर)


कृती समितीची निवड
यावेळी उपस्थितांमधून नियोजित तळेरे तालुका कृती समितीची निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत डंबे, उपाध्यक्ष- राजू जठार, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सचिव- उल्हास कल्याणकर, राजकुमार तळेकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सहसचिव- उदय दुधवडकर, शशांक तळेकर, रमाकांत वरूणकर, हेमंत मालंडकर, खजिनदार- मारूती वळंजू, नीलेश सोरप, विनय पावसकर, निमंत्रक- नीलेश तळेकर, प्रवीण वरूणकर, कायदेविषयक सल्लागार- प्रसाद करंदीकर, महिला प्रतिनिधी- दर्शना बांदिवडेकर, पुष्पलता तळेकर, पत्रकार- संजय खानविलकर, मुंबई समिती अध्यक्ष- सूर्यकांत तळेकर, उपाध्यक्ष बेबीताई तळेकर, सदस्य प्रतिनिधी- संतोष जठार, सदानंद घाडी, मोहन खानविलकर, प्रमोद वायंगणकर, चिंतामणी कल्याणकर यांची निवड करण्यात आली.

Web Title: The formation of Talare taluka requires organizational efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.