माजी आमदार जयानंद मठकर यांचे निधन
By admin | Published: April 7, 2016 11:27 PM2016-04-07T23:27:11+5:302016-04-07T23:58:22+5:30
आज अंत्यसंस्कार : बेळगावातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
सावंतवाडी : समाजवादी नेते, माजी आमदार, स्वातंत्र्य-सेनानी तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद शिवराम मठकर (वय ८७) यांचे गुरुवारी सकाळी बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सावंतवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी आमदार जयानंद मठकर यांचा जन्म मुंबई येथे १२ आॅक्टोबर १९२९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. ते नॅशनल काँग्रेस गोवा आणि गोवा विमोचन समितीचे सक्रिय कार्यकर्ते होते.
मठकर यांनी समाजवादी पक्ष वाढीसाठी गावागावांत जाऊन प्रयत्न केले. समाजवादी पक्षाने त्यांना १९७४ साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी दिग्गज उमेदवारांना पराभूत करत विजय संपादन केला. या त्यांच्या विजयाने समाजवादी पक्षाला नवचैतन्य मिळाले होते. १९७८ सालीही मठकरच या मतदारसंघातून निवडून आले होते. सहा वर्षे मठकर यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नंतरच्या निवडणुकीत जयानंद मठकर यांचा पराभव झाला तरी त्यांनी सामाजिक कार्याचा वसा सोडला नाही.
पक्षाच्यावतीने होणारे मोर्चे, तसेच आंदोलने यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक वेळा त्यांना वेगवेगळ्या आंदोलनांसाठी कारावासही भोगावा लागला आहे. त्यांनी विधानसभेत सिंधुदुर्गच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. बांधकाम विभागाच्या रस्ता कामगार यांच्यासाठी अनेक आंदोलनेही केली होती. नेमळे येथील
(पान १ वरून) कौल कारखाना तसेच श्रीराम वाचन मंदिर या संस्था त्यांच्यावरील असलेल्या विश्वासानेच चालत होत्या.
दहा वर्षांपासून त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणापासून तसेच समाजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. सिंधुदुर्गच्या राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. दंडवते सावंतवाडीत आल्यावर नेहमी मठकर यांच्याकडेच यायचे. मठकर यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
यामध्ये आर्यभूषण पुरस्कार, राष्ट्रवादीचा राज्यस्तरीय ग्रंथालय सन्मान पुरस्कार, संपादक गौरव पुरस्कार, भाईसाहेब सावंत स्मृती पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे, तर २००१ मध्ये त्यांचा सावंतवाडीवासीयांच्या वतीने नागरी सत्कारही करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष ग. प्र. प्रधान, मृणालताई गोरे, मधु मंगेश कर्णिक, शिवरामभाऊ जाधव उपस्थित होते.
जयानंद मठकर यांनी सावंतवाडीत पार पडलेल्या विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच स्वागत अध्यक्षपदही भूषविले होते.
गेल्या महिन्याभरापासून त्यांना बेळगाव येथील के.एल.ई. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्यांची प्रकृती आणखीच खालवली. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
मठकर यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मठकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या उभाबाजार येथील निवासस्थानी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार
माजी आमदार जयानंद मठकर यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी विविध पक्षाचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, गोवा व महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मधु दंडवतेंचे जीवन चरित्र अपुरे राहिल्याचे शल्य
माजी आमदार जयानंद मठकर यांचे मधु दंडवते यांच्याशी जवळचे नाते होते. त्यामुळे मठकर यांनी दंडवते यांचे जीवन चरित्र लिहिण्याचा संकल्प सोडला होता. मात्र, त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नसल्याने हे जीवन चरित्र लिहिणे राहिल्याचे त्यांनी अनेकजणांकडे बोलून दाखवले होते. हे शल्य त्यांना कायम राहिले होते.