..त्यामुळे आदित्य ठाकरे शिमगा करतायत, माजी खासदार सुधीर सावंतांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: October 31, 2022 05:18 PM2022-10-31T17:18:24+5:302022-10-31T17:19:44+5:30
महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि त्यानंतर टोल वसुली करून विरोध मागे घ्यायचा हा ठाकरे कुटुंबियांचा फार जुना व्यवसाय
कणकवली: राज्यातील सत्ता आणि स्वतःचे मंत्रीपद गेल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वैफल्यग्रस्त बनले आहेत. ते शिंदे सरकारच्या नावाने विनाकारण बोंबाबोंब करून ऐन दिवाळीतच शिमगा करत असल्याचा आरोप माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला आहे.
त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टाटा एअर बस आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्याला शिंदे सरकार जबाबदार आहे, असा आदित्य ठाकरेंचा आरोप आहे. मात्र हा आरोप करताना ते प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी काय प्रयत्न केले होते हे सांगायला ते विसरले. त्याहीपलीकडे हे प्रकल्प गुजरातला गेले असा आरोप करताना त्यांचा महाराष्ट्र सरकारशी एमओयू झाला होता का ? त्याचीही माहिती देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. अशा प्रकारे अर्धसत्य सांगून राज्यातील तरुणांची माथी भडकवायची आणि सत्ता गेल्यानंतर आलेल्या वैफल्याचा कंड शमवायचा हा केविलवाणा प्रकार आहे.
महाविकास आघाडीच्या वसुली सरकारमुळे मोठमोठ्या कंपन्यांना हप्ते देऊन आपला उद्योग महाराष्ट्रात उभारण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात आपला प्रकल्प नेणे अधिक सोयीस्कर वाटले. आदित्य ठाकरेंनी सचिन वाझेला वेळीच आवर घातला असता तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांना आपला रोजगार गमावण्याची वेळ आली नसती. आता मविआ सरकारच्या काळातील स्वतःच्या पापांचे खापर नाहक शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणायचे असतील तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात लागलेला ‘वसुली सरकार’ हा डाग पुसणे आवश्यक आहे. तरच नवीन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी तयार होतील.
ठाकरे कुटुंबियांचा 'हा' जुना व्यवसाय
एनरॉन प्रकल्प समुद्रात बुडवू म्हणणाऱ्या शिवसेनेची नंतर भूमिका बदलली हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि त्यानंतर टोल वसुली करून विरोध मागे घ्यायचा हा ठाकरे कुटुंबियांचा फार जुना व्यवसाय आहे. जे एन्रॉन प्रकल्पाच्या बाबतीत झाले त्याचाच कित्ता पुढे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत गिरवण्यात आला.
आदित्य ठाकरेंनी दुटप्पीपणा सोडावा
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामध्ये जवळपास तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील सुमारे दीड लाख तरुणांना प्रत्यक्ष रोजगार आणि तीन लाख तरुणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. मात्र ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत या प्रकल्पाला विरोध करत आहेत. आता हा विनायक राऊतांचा वैयक्तिक टोलवसुलीसाठी प्रत्यत्न आहे की आदित्य ठाकरेंनीच त्यांना टोल वसुलीसाठी पाठवले आहे हे एकदा स्पष्ट व्हायला हवे. यापेक्षा दुटप्पीपणाचे दुसरे उत्तम उदाहरण कुठले असू शकत नाही. आदित्य ठाकरेंनी किमान यापुढे तरी हा दुटप्पीपणा सोडावा आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्यातील उद्योजकांची टोलवसुलीपायी पिळवणूक करू नये, असेही सुधीर सावंत यांनी म्हटले आहे.