पर्यटनाबरोबरच व्यापार वाढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; सुरेश प्रभू यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:01 PM2022-01-31T23:01:44+5:302022-01-31T23:02:51+5:30
कणकवली येथे चौंडेश्वरी मंदीर सभागृहात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापरी महासंघ व कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने व्यापारी एकता मेळाव्याचे आयोजन कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली: कोकण व्यापारात व शिक्षणात पूर्वीपासूनच पुढारलेले आहे.कोकणातील माणसे मागासलेली कधीच नव्हती. इथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे.मात्र, हळूहळू त्या सुविधा निर्माण होत आहेत. कोकण किनार पट्टीवर वादळासारख्या नैसर्गिक आपत्ती सध्या मोठ्या प्रमाणावर येत असून पर्यावरणाची हानी रोखणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. येथील पर्यटन वाढले तर व्यापार वाढेल,रोजगार निर्माण होईल. त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
कणकवली येथे चौंडेश्वरी मंदीर सभागृहात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापरी महासंघ व कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने व्यापारी एकता मेळाव्याचे आयोजन कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले होते. या मेळाव्यात सुरेश प्रभू ऑनलाइन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ते पुढे म्हणाले, कोकणातील गावात जत्रा असते तेव्हा आजूबाजूला गावातील लोक तिथे येत असतात.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात दुकाने बंद ठेवून व्यापारी दरवर्षी सहभागी होत आहेत.हे कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीमुळे व्यापारी अडचणीत होता.आता हळूहळू ती परिस्थिती सुधारत आहे. आपल्या गावातील जुनी मंदिरे पाहिल्यानंतर गावची विशालता किती होती, हे आजही दिसून येते. येथील जनतेमुळेच माझा राजकीय जन्म झाला. प्रथम खासदार झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा करता येईल ? याबाबत टाटा कन्सल्टन्सी कडून आराखडा तयार करून घेतला होता.पर्यटनातून येथील विकास साधने शक्य असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
हुशार मानसांशिवाय येथील विकास झालेला नाही. येथे बुद्धिमान माणसे आहेत. मी खासदार म्हणून निवडून येण्यापेक्षा मधु दंडवते यांचा त्यावेळी पराभव झाला होता. याचे दुःख मला जास्त वाटले होते. पायाभूत सुविधा असतील तर कोकणी माणसाचा विकास झपाट्याने होईल.पर्यटन क्षेत्रात विकास झाल्यास तरुणांच्या हाताला काम मिळेल. सध्या हवामान बदलाचा परिणाम वाढू लागला आहे. त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. शेती,पर्यटन,व्यापारी ही एक चेन आहे. त्यातील व्यापार हा महत्वाचा भाग आहे.त्याच्या वाढीसाठी सर्वांनी काम केले पाहिजे.असेही सुरेश प्रभू यावेळी म्हणाले.
या मेळाव्याला ऑनलाइन प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार नितेश राणे आदी उपस्थित राहिले. तसेच त्यांनी शुभेच्छाही दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,कार्यवाह नितीन वाळके,कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी,पंचायत समिती सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे,कर सल्लागार सुनील सौदागर,स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण सरंबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई,कर अधिकारी प्रताप आजगेकर,विनय सामंत, अमोल खानोलकर, राजन नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी ललित गांधी यांच्या हस्ते जिल्हा व्यापारी संघाचे मानद सद्स्यत्व कर अधिकारी प्रताप आजगेकर यांना बहाल करण्यात आले. नितीन वाळके यांनी सूत्रसंचालन केले. मी यापुढे राजकीय निवडणूक लढविणार नाही! मी यापुढील काळात राजकीय निवडणूक लढवणार नाही.राजकीय पक्ष विरहित काम करणार आहे.तुमचे माझे संबध हे राजकारण विरहित आहेत. त्यामुळे व्यापारी संघ ज्यावेळी हाक देईल त्यावेळी कोकण विकासासाठी मी निश्चितच पुढे येईन, असे सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले.