शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2016 12:01 AM2016-02-19T00:01:55+5:302016-02-19T00:21:05+5:30

रघुजीराजे आंग्रे : हर्णैत जयभवानी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती कार्यक्रम

The fort of Shivrajaya should be cultured | शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

Next

दापोली : शिवरायांचा खरा इतिहास म्हणजे त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारे ३५० गड किल्ले आहेत. हा इतिहास सध्या ‘ढासळत’ आहे. अरबी समुद्रात होणारे शिवरायांचे भव्य स्मारक पाहिल्यावर कुणा परदेशी व्यक्तीला त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा झाली, तर त्यांना दाखवण्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडूजी होणे गरजेचे असल्याचे मत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी हर्णै येथे बोलताना व्यक्त केले.हर्णै येथील जयभवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, कोकणशी आमची नाळ जोडली गेली आहे. आपण नेहमी येथील गड - किल्ल्यांना भेटी देत असतो. त्यातून आपणाला पूर्वजांना भेटल्याचा आनंद मिळतो. सध्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे वारे वाहात आहेत. शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्यच असायला पाहिजे. महाराष्ट्र काही गरीब राज्य नाही, हे सध्या उघड होणाऱ्या घोटाळ्यांच्या आकड्यांवर लक्ष टाकल्यास सहज लक्षात येते. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाला शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहण्याची इच्छा झाली व त्याने शिवरायांनी बांधलेले किल्ले पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना काय किल्ल्यांचे पडलेले दगड दाखवणार? त्यांच्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुजी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
याबाबत ते म्हणाले की, सर्व काही सरकार करेल, या भ्रमात कुणी राहू नये. आपल्याला याकरिता काय करता येईल, याचा विचार करावा. सध्या प्रत्येक किल्ल्यात दारूच्या फोडून टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कुरकुऱ्यांची पाकिटे, सिगारेटची थोटूके असा बराच ऐवज पडलेला आपल्याला आढळून येतो. ज्या गावात किल्ला आहे, त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांनी एकदा किल्ल्यातून चक्कर मारली व श्रमदान केले, तर हा किल्ला सहज स्वच्छ होईल. किल्ल्यांमधील वाढलेली झाडी साफ होईल, किल्ल्यात राबता वाढेल. तसेच कुणीतरी येऊन साफसफाई करतंय असं समजल्यावर गावात थोडा दबाव निर्माण होईल व अस्वच्छतेचं प्रमाण कमी होईल. यातून पर्यटकांची संख्या वाढेल आणि रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सोमनाथ पुन्हा बांधलं जातं, तर रायगडाचीदेखील पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आपण करणार आहोत.(प्रतिनिधी)


कोकणात अजूनही आपूलकी शिल्लक
आपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने दैनंदिन जीवनात काही वेगळेपणा अनुभवास येतो का? लोकांचा दृष्टीकोन कसा असतो? याबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने आपणाला गर्व वाटतो. आपल्या पूर्वजांची ही कर्मभूमी असल्याने आपण नेहमी कोकणात येतो. एसएससी झाल्यावर आपण सायकलवरून कुलाबा ते सिंंधुदुर्ग अशी सायकल भ्रमंती केली होती. कोकणात अजून आपूलकी शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.

किल्ल्यांची डागडुजी होणे आवश्यक : आंग्रे.
आंग्रे घराण्याची कोकणशी नाळ.
गड, किल्ल्यांच्या भेटीतून पूर्वजांना भेटल्याचा आनंद ; रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन.

Web Title: The fort of Shivrajaya should be cultured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.