जिल्ह्यात चाळीस टक्के दुचाकीस्वारांकडे हेल्मेट
By admin | Published: July 27, 2016 11:59 PM2016-07-27T23:59:26+5:302016-07-28T00:59:34+5:30
शासनाची दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती : अजूनही सव्वा दोन लाख हेल्मेटची आवश्यकता; सक्तीपेक्षा जिवाचे मोल ओळखण्याची गरज
गिरीष परब-सिंधुदुर्गनगरी --राज्य शासनाने हेल्मेट सक्ती केल्यामुळे दुचाकीस्वार व त्याच्यासोबत बसणाऱ्या अशा दोघांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक बनले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात एक लाख ४० हजार दुचाकींची संख्या असून, शासन निर्णयानुसार जिल्ह्यात २ लाख ८० हेल्मेटची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार दुचाकी संख्येच्या ४० टक्के म्हणजे ५६ हजार दुचाकीस्वार हेल्मेट वापरत आहेत. उर्वरित २ लाख २४ हजार हेल्मेटची आवश्यकता सिंधुदुर्गातील मोटारसायकलस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला भासणार आहे.
शासन निर्णयानुयार सिंधुदुर्गातही हेल्मेट सक्तीचे होणार आहे. पण या सक्तीपेक्षाही जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने हेल्मेट वापरणे काळाची गरज बनली आहे. दुचाकीस्वारांनी याचे भान ठेवून काळजी घेतली तर आगामी काळात अगदी अत्यल्प दिवसात जिल्ह्यातील दुचाकीस्वारांकडे हेल्मेट प्राप्त होऊन हेल्मेटसक्ती आवाक्यात येऊ शकते.
दिवसागणिक वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळे वारंवार होणारे अपघात यामुळे सर्रास डोक्याला इजा पोहोचून दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. याशिवाय अशा अपघातातील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
या अपघातांना आळा घालावा म्हणून दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या दोघांनाही सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच हेल्मेट सक्ती (फेबु्रवारी २०१६) करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाची बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नव्हती. याचे गांभीर्य ओळखून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मोटारसायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यापुढे दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घातले नसेल, तर त्यांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय २१ जुलै रोजी विधानसभेत घेतला. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरात मोटारचालक व राजकारणी मंत्र्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. तर काहींनी राज्यशासन आमच्यावर हेल्मेटसक्ती लादू शकत नसल्याच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, खरे पाहता आपल्या सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.
सिंधुुदुर्गात रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. जिल्ह्याचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ४० हजार एवढी मोटारसायकलची संख्या आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक दुचाकीच्या मागे दोन हेल्मेटची आवश्यकता लक्षात घेता सिंधुदुर्गाला २ लाख ८० हजार हेल्मेटची आवश्यकता आहे. मात्र, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात केवळ दुचाकी संख्येच्या ४० टक्के, म्हणजेच ५६ हजार दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, २ लाख २४ हजार दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीकडे सद्यस्थितीत हेल्मेट उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे.