विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणाऱ्या वसुंधरा ट्रस्टचे संस्थापक सी.बी.नाईक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:12 PM2020-04-18T18:12:09+5:302020-04-18T18:17:23+5:30
बाबा आमटे यांच्या ज्या शिष्यांनी संस्था काढून २५-२५ वर्षे चालवल्या, त्यात सी.बी. नाईक यांचा समावेश आहे.
सावंतवाडी - कोकणातील कुडाळ नेरूर येथील वसुंधरा ट्रस्ट या विज्ञान प्रसार करणा-या संस्थेचे संस्थापक सी.बी.नाईक(85) यांचे वृध्दापकाळामुळे शनिवार दिनांक १८ एप्रिल, २०२० रोजी पहाटे निधन झाले.
प्रकृतीच्या कारणास्तव गेले वर्षभर ते घरीच होते आणि नुकत्याच झालेल्या वसुंधरा ट्रस्टच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला ते जाऊ शकले नाहीत. बाबा आमटे यांच्या ज्या-ज्या शिष्यांनी संस्था काढून २५-२५ वर्षे चालवल्या, त्यात सी.बी. नाईक आणि डॉ. अशोक बेलखोडे (साने गुरुजी रुग्णालय, किनवट, नांदेड) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
बँक ऑफ इंडियात कामाला असणा-या सी.बी.नाईक यांनी तेथून स्वेच्छा निवृत्ती घेत कुडाळ या आपल्या मूळ गावी वसुंधरा ट्रस्टची स्थापना करून कुडाळ व आजूबाजूच्या भागातील मुलांना विज्ञानाची गोडी लावली. एवढेच नव्हे तर त्यांना उच्च शिक्षणासाठी पात्र करण्याचे दुष्कर काम त्यांनी लीलया पार पाडले. ही संस्था चालवण्यासाठी त्यांनी मुंबईतून सतत पैसे जमा केले. 2017 मध्ये मराठी विज्ञान परिषदेचे ५२ वे अखिल भारतीय अधिवेशन त्यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे भरले होते.
सीबी काकांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी केलेले कार्य मोठे - सुरेश प्रभू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसुंधरा विज्ञान संस्थेच्या माध्यमातून विज्ञान चळवळ रुजवणारे, भारत रत्न बाबा आमटेचे सह्कारी व माझे जेष्ठ मित्र सी बी नाईक उर्फ सी बी काका हे आज अनंतात विलीन झाले सिंधुदुर्गातील विज्ञानाबद्दलचे कुतूहल हेरून सीबी काकांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी निर्माण केलेले फार मोठे कार्य वसुंधराच्या माध्यमातून आज उभे आहे.अनेक दशकातून असे विज्ञानप्रेमी समाजसेवक निर्माण होतात.सीबी काकांच्या कार्यास आणि स्मृतीस माझे अभिवादन.त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवणे हिच त्याना खरी श्रद्धांजली.