अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:23 PM2020-02-07T16:23:55+5:302020-02-07T16:24:58+5:30
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले.
कणकवली : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. या चारही आरोपींना ओरोस येथील जिल्हा विशेष न्यायालयात गुरुवारी हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कणकवली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी सुधीर रामचंद्र पवार (२९) याच्याविरोधात पीडित युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांच्याकडे तपासासाठी वर्ग झाला होता. या शाखेने या प्रकरणातील संशयित सुधीर पवार व अन्य तीन आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणात मुख्य संशयित सुधीर रामचंद्र पवार (२९) याला संबंधित गुन्ह्यासाठी मदत करणारे संशयित दीपक भिकू पवार (४३), मंगल केशव पाटील (३४), राजाराम कृष्णांत पाटील (३४, सर्व राहणार आसनगांव, ता. खटाव, जि. सातारा) यांनाही अटक केली आहे.
संशयितांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. वर्षभरापूर्वी संशयित आरोपींनी कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील पीडित मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन सावंतवाडी येथील अंकुर सुधारगृहात ठेवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील करीत आहेत.