आरोंदा तेरेखोल खाडीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळल्या, महसूल विभागाची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:02 AM2022-01-17T11:02:11+5:302022-01-17T11:05:02+5:30
सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोटवर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे.
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील गोवा व सिंधुदुर्गला जोडलेल्या तेरेखोल खाडीत अवैद्य रित्या बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या तीन ते चार होड्यावर कारवाई करत त्या होड्या जाळण्यात आल्या. महसूल विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैद्य वाळू उपसा करत असलेल्याना चांगलाच दणका बसला. ही कारवाई आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
आरोंदा येथील तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होती. यासंबंधी अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचे इशारा देऊनही ही वाळू उपसा थांबत नव्हती. त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या विरोधात धडक कारवाई केली.
आज, सोमवारी पहाटे तहसीलदारांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन धडक कारवाई करत तीन ते चार बोटी जप्त करत त्या जाळल्या. सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे ही प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. यावेळी बोट वर असलेल्या कामगारांना ही ताब्यात घेण्यात आले आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी या बोटीचे मालक ही शोधून काढण्यात येतील असे सांगितले.