मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 04:52 PM2022-07-23T16:52:09+5:302022-07-23T16:52:30+5:30
सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली
सावंतवाडी : कोळसा वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे स्टेशनवर सुटल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडला. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर हे डबे तत्काळ जोडून ही मालवाहतूक रेल्वे गोव्याच्या दिशेने रवाना झाली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्टेशनपासून अलीकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या घटनेनंतर गाडी थांबविण्यात आली.
रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानी डबे जोडून गाडी पूर्ववत केली. मालवाहतूक करत असलेल्या या रेल्वेला डबल इंजिन नसल्याने हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आला नसल्याचे सांगितले जात आहे; मात्र स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची कल्पना मोटरमनला दिली. या घटनेबाबत रेल्वेकडून चौकशी करण्यात येत आहे.