सिंधु कृषी प्रदर्शनात चार कोटींची उलाढाल
By admin | Published: April 22, 2015 09:51 PM2015-04-22T21:51:44+5:302015-04-23T00:40:26+5:30
रणजित देसाई यांची माहिती : ७० हजार शेतकऱ्यांनी दिली भेट
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधु-कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी मेळ््यामध्ये ७० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली. या चार दिवसांच्या प्रदर्शनामध्ये तब्बल चार कोटी ४० लाख रूपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.
कृषी व पशुसंवर्धन विभाग आयोजित सिंधु कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी मेळा कुडाळ येथे १७ ते २० मार्च या कालावधित झाला. जिल्ह्यात सुरू असलेल्या परंपरागत शेती व्यवसायाला व तुटपुंज्या परिस्थितीत सुरू असलेल्या दुग्ध व्यवसायाला यांत्रिकीकरण व आधुनिकतेची जोड देण्याचे काम मेळाव्यामुळे साध्य झाले. या मेळाव्यात १८६ स्टॉलधारक कंपन्या व वितरकांनी सहभाग घेतला. यामध्ये खते, औषधी, बी-बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर्स, सिंचन साधने, अॅक्वाकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, पशुखाद्य, डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्रीबाबत तसेच अर्थसहाय करणाऱ्या संस्था याचबरोबरच शासकीय योजना, रंगीत मत्स्यपालन, मत्स्य शेती, विविध पक्षी, कृषी विद्यापीठ, निळेली पशु केंद्र यांच्या योजना व माहिती तसेच आंबा, काजू व तत्सम फलोत्पादन तसेच उसासारख्या नगदी पिकांसाठी आवश्यक उपकरणे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एका मंडपाखाली उपलब्ध करून देण्यात आले. याच्या बरोबरीने महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी आवश्यक घरघंटी, गृहोपयोगी वस्तू, आरोग्यविषयक औषधे व उपकरणे, शोभिवंत झाडे, आदी गोष्टी अत्यल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
या कालावधित जिल्हा बँकेमार्फत देण्यात आलेल्या दोन टक्के व्याजदरात सूट यामुळे शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री व अवजारे खरेदी करता आली. ऊसतज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे तसेच राजेंद्र पाटील यांचे गोठा व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांशी थेट परिसंवाद होऊन त्यांंच्या काही प्रश्नांचे निराकरण झाले. सिंधु शेतीनिष्ठ पुरस्कार व भातपीक स्पर्धा, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व निष्ठावंत पशुधन पालक यांचाही त्यांच्या क्षेत्रातील कामाबद्दल सन्मान करण्यात आला.
या मेळाव्यामध्ये जिल्ह्याबाहेरून विविध प्रजातींची जनावरे, शेळ््या, कोंबड्या, ससे, कालवड आलेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १०० दुधाळ जनावरांची खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून जनावरे आणण्याच्या वाहतूक खर्चात बचत झाली असून, तीन दिवस प्रत्येक जनावर पाहता आले. त्या जनावरांचे मिळणारे दूध व आवश्यक चाऱ्याचे प्रमाण या सर्व गोष्टींची माहिती घेता आली.
या महोत्सव कालावधीत डॉग शोमध्ये जिल्ह्यातील २७ विविध जातीच्या श्वानप्रेमींनी सहभाग घेतला. तसेच सुदृढ गाय, वासरू, बैल, म्हैस, शेळी, बैलगाडी सजावट स्पर्धामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन या विविध स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणली व मेळावा यशस्वी करण्यास सहकार्य केले.
या महोत्सवाचे औचित्य साधून दुग्ध उत्पादन वाढीच्या हेतूने जिल्ह्यातील ११० लाभार्थी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे अनुदानावर कडबाकुट्टी यंत्रणे, ४१ दुग्ध सोसायटींना अनुदानीत फॅट वितरण करण्यात आले. त्या अनुषंगाने काही सोसायटींकडून माहिती घेतली असता फॅट
मशिनच्या वितरणामुळे दुधाचा फॅट दररोज व्यवस्थित तपासता
येत अधिकृत नोंदीमुळे दुधाला नियमित चांगला भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
१०० दुधाळ जनावरांची खरेदी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १०० दुधाळ जनावरांची खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून जनावरे आणण्याच्या वाहतूक खर्चात बचत झाली असून, तीन दिवस प्रत्येक जनावर पाहता आले. त्या जनावरांचे मिळणारे दूध व आवश्यक चाऱ्याचे प्रमाण याची माहिती घेता आली.
महोत्सवाचे औचित्य साधून दुग्ध उत्पादन वाढीच्या हेतूने जिल्ह्यातील ११० लाभार्थी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे अनुदानावर कडबाकुट्टी यंत्रे, ४१ दुग्ध सोसायटींना अनुदानीत फॅट मशिनचे वितरण करण्यात आले.