अपहरणप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: April 17, 2017 11:15 PM2017-04-17T23:15:07+5:302017-04-17T23:15:07+5:30
अपहरणप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी
कणकवली : तालुक्यातील फोंडा-खैराटवाडी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या मालवण तालुक्यातील आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर याच्यासह तिघांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
दरम्यान, कोठडीत जाताच गावकर याचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजन गावकर, अमित गावकर, श्याम निकम या तिघांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन निकम (रा. कोल्हापूर) याला रविवारी अटक झाली होती. त्याला सोमवारपर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. त्याला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी ६ वाजता आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर याने आपल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून या मुलीला पळविल्याचा आरोप या मुलीच्या नातेवाइकांनी केला होता. शनिवारी पोलिसांनी बबन निकम याला अटक केली होती. सोमवारी सकाळी या प्रकरणातील अन्य तीन आरोपी राजन जगन्नाथ गावकर (५३), अमित राजन गावकर (२४, रा. आचरा) व श्याम निकम (रा. मुणगे) यांना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
फोंडा-खैराटवाडी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या बबन निकम, राजन गावकर, श्याम निकम व अमित गावकर यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाची जुळवाजुळव करणारा आचरा येथील माजी सरपंच राजन गावकर व श्याम निकम यांना अटक करा, अशी मागणी महिला दक्षता समितीच्या स्नेहा तेंडुलकर, शमिता बिरमोळे यांनी पोलिसांकडे करत जाब विचारला होता.
संशयितांना अटक न झाल्यामुळे कातकरी समाजाच्यावतीने आंदोलनाचा इशारा चित्रकार नामानंद मोडक व अंकुश कदम यांनी दिला होता. राजन गावकर याला अटक न केल्यास कातकरी समाजाच्यावतीने आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यामुळे अखेर पोलिसांना राजन गावकर याच्यासह अन्य तिन्ही आरोपींना अटक करणे भाग पडले. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)