मायनिंग उद्योगावरून चार डंपरच्या काचा फोडल्या

By admin | Published: December 22, 2016 11:10 PM2016-12-22T23:10:19+5:302016-12-22T23:10:19+5:30

सहा जणांवर गुन्हा : लोरे नं. १ मधील घटना

Four dumpers were blasted by the mining industry | मायनिंग उद्योगावरून चार डंपरच्या काचा फोडल्या

मायनिंग उद्योगावरून चार डंपरच्या काचा फोडल्या

Next

कणकवली : तालुक्यातील लोरे नं. १ सिलिका मायनिंग उद्योगावरून वादंग उफाळले आहे. सिंधुुदुर्ग खनिज उद्योग कंपनी चालविण्यास न दिल्याच्या रागातून मेसर्स एस्मो ट्रेडिंग कॉर्पाेरेशन, लोरे सिलिका सँड माईन्स या कंपन्यांच्या कार्यालयासमोरील चार डंपरच्या काचा फोडण्यासह डंपरचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच कंपनीतील नरेश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुकी करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नरेश गुरव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शांताराम रावराणे, राकेश रावराणे यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत मेसर्स एस्मो ट्रेडिंग कॉर्पाेरेशन, लोरे सिलिका सँड माईन्समध्ये कार्यरत असलेले नरेश धाकू गुरव (वय ४५, रा. लोरे नं. १, सोनारवाडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. यात म्हटले आहे की, एस्मो ट्रेडिंग कंपनी के. के. सुवर्णा (रा. कावळा नाका, कोल्हापूर) हे १९८१ पासून लोरे नं. १ येथे चालवित आहेत. तसेच सिंधुदुर्ग खनिज उद्योग ही कंपनी एम. बी. पाटील (रा. बेळगाव) हे चालवित होते. के. के. सुवर्णा यांनी २००९ साली सिंधुदुर्ग खनिज उद्योग माईन्स कंपनी विकत घेतली. दीड महिन्यापूर्वी के. के. सुवर्णा यांच्याकडे लोरे नं. १ येथील शांताराम वासुदेव रावराणे यांच्यासह पाचजणांनी सिंधुदुर्ग खनिज कंपनी आम्हाला चालवायला द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी मी व आमचे कामगार रावजी तुकाराम गुरव, हरिश्चंद्र रामचंद्र जाधव, मधुकर रामचंद्र गुरव, रघुनाथ सहदेव रावराणे, अनंत भाऊ रावराणे, नंदकुमार मोहन राजाध्यक्ष हे सकाळी ८ वा.च्या सुमारास कामावर आलो होतो.
दुपारी १.१५ च्या सुमारास शांताराम रावराणे, अलंकार ओमप्रकाश रावराणे, चंद्रकांत वासुदेव रावराणे, प्रदीप बळिराम गुरव, राकेश ऊर्फ छोटू हरिश्चंद्र रावराणे, भगवान वामन राणे व योगेश काशिनाथ राणे हे सातजण मोटारसायकलवरून तेथे आले.
मोनाव्हाळ येथील आमच्या आॅफिसजवळ कंपनीचे डंपर (एमएच ०७-६१४, एमएच ०७-६१५, एमएच ०९-५७२३, एमएच ०७-६१६) उभे करून ठेवण्यात आले होते. या चार डंपरच्या समोरील काचा लोखंडी रॉडने त्या सातजणांनी फोडल्या. तसेच एका डंपरच्या गाडीची डिझेल टाकी फोडण्याचा प्रयत्न केला.
शांताराम रावराणे यांना मी डंपर फोडू नका म्हणालो असता त्याने नरेशला कंपनीची जास्त काळजी आहे. त्याला ठार मारून टाकू, असे म्हटले. तसेच आपल्या सहकाऱ्यांसह हातात लोखंडी रॉड घेऊन माझा पाठलाग करीत कार्यालयात आले. शांताराम रावराणे याने मला ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी रॉड माझ्या डोक्यावर मारला. तसेच मी तेथून पळ काढला. मात्र, शांताराम रावराणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच कार्यालयातील इतर कामगारांनादेखील येथे काम केले तर ठार मारू अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतील कामगार तेथून पळून गेले. दरम्यान, नरेश गुरव यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सातजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four dumpers were blasted by the mining industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.