सैनिक अॅकॅडमीच्या चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू; देवगडमध्ये आल्या होत्या सहलीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:08 AM2023-12-10T06:08:51+5:302023-12-10T06:09:13+5:30
या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुणही समुद्रात बेपत्ता आहे. ही दुर्घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
देवगड (जि. सिंधुदुर्ग) : पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथील निगडी भागातील रूपीनगर परिसरातील सैनिक अॅकॅडमीच्या सहलीमधील विद्यार्थ्यांना समुद्रस्नानाचा मोह आवरला नाही. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने यातील सहा विद्यार्थी समुद्राच्या लाटांमध्ये अडकून बुडाले. यातील चार मुलींचे मृतदेह मिळाले असून, एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले, तर या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुणही समुद्रात बेपत्ता आहे. ही दुर्घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रेरणा रमेश डोंगरे (२१), अनिशा नितीन पडवळ (१९), अंकिता राहुल गलाटे (२१) आणि पायल राजू बनसोडे (२१, सर्व रा. चिखली) यांचे मृतदेह मिळाले असून, आकाश सोमाजी तुपे (२२, रा. रूपीनगर, निगडी) याला वाचविण्यात यश आले. रामचंद्र घनश्याम डिचोलकर (२२, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) हा बेपत्ता आहे.