समुद्रात चार हायस्पीड ट्रॉलर्स पकडले
By admin | Published: October 25, 2015 11:24 PM2015-10-25T23:24:09+5:302015-10-25T23:29:57+5:30
आठ तास थरार : कर्नाटकातील ३५ खलाशी ताब्यात, मालवणातील मच्छिमारांची कारवाई
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि मालवणातील गिलनेटधारक मच्छिमार व ट्रॉलर्स व्यावसायिक यांच्यात मध्यरात्री भर समुद्रात थरारक संघर्ष झाला. आठ तास सुरू असलेल्या थरारानंतर १० ते १२ वाव खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या चार हायस्पीड ट्रॉलर्सना मच्छिमारांनी पाठलाग करून पकडले. रविवारी सकाळी हे ट्रॉलर्स मालवण बंदरात आणण्यात आले. समुद्र्रातील संघर्षानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण थांबविण्यासाठी मत्स्य विभागाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. याच्या निषेधार्थ गिलनेट व ट्रॉलर्स मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आंदोलनाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी संरक्षण देण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मच्छिमारांनी नियोजनबद्ध आखणी करून ट्रॉलर्समालक संघटनेचे अध्यक्ष अशोक तोडणकर व इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने २५ ट्रॉलर्समधून शेकडो मच्छिमार आंदोलन करण्यास समुद्र्रात रवाना झाले होते. मालक आल्यानंतरच
बोटी सोडणार
पकडलेल्या हायस्पीड बोटी मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या जातील. मात्र, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पुरेशी नाही. आम्हा मच्छिमारांच्या शेकडो जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान हायस्पीड ट्रॉलर्संनी केले आहे. त्याची भरपाई मिळावी. तसेच यापुढे ३० ते ३५ वाव खोल समुद्र्राच्या आत एकही हायस्पीड व पर्ससीन येता कामा नये. याबाबत बोटमालक व त्या राज्यातील हायस्पीड संघटनेचे पदाधिकारी येऊन चर्चा करणार नाहीत तोपर्यंत हे हायस्पीड बंदरातून सोडणार नाही,असा आक्रमक पवित्रा मच्छिमारांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासन अशा मासेमारीबाबत उपाययोजना करत नसल्याने मच्छिमारांना कायदा हातात घ्यावा लागत आहे. मच्छिमारांच्या आक्रमक पवित्र्याची ही सुरुवात असून भविष्यात समुद्र्रात गंभीर प्रसंग घडल्यास शासनकर्ते जबाबदार राहतील, असे ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक तोडणकर, गोपी तांडेल, कृष्णनाथ तांडेल व अन्य मच्छिमारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भरसमुद्र्रात मध्यरात्री थरारक पाठलाग
मालवण किनारपट्टीवर तळाशील समुद्र्रातील कवडा रॉक येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास १० ते १२ वाव समुद्रात कर्नाटकातील मलपी, उडपी आणि कारवार येथील २०० ते २५० हायस्पीड ट्रॉलर्स घुसखोरी करून मासळीची लूट करीत असल्याचे मच्छिमारांच्या निदर्शनास आले. मच्छिमारांनी या ट्रॉलर्सना घेरण्याचा प्रयत्न केला.
काही ट्रॉलर्सनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मच्छिमारांनी जिवाची पर्वा न करता एका हायस्पीड ट्रॉलरला घेरून एकाचवेळी थेट हायस्पीड ट्रॉलर्समध्ये प्रवेश केला. त्यावेळी खलाशांनी प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्या खलाशांना ताब्यात घेत अन्य हायस्पीड ट्रॉलर्सचा पाठलाग करण्यास सांगितले.
पहाटे ६ वाजेपर्यंत आणखी तीन हायस्पीड ट्रॉलर्स पकडण्यात यश आले. या चार ट्रॉलर्समधून ३० ते ३५ जणांना ताब्यात घेऊन मालवण बंदर येथे सकाळी आणले. हे सर्व हायस्पीड ट्रॉलर्स कर्नाटकातील असून मलपी, उडपी व मंगलोर बंदरातील आहेत.
किनारपट्टीवर पोलीस छावणीचे स्वरूप
मच्छिमारांनी शनिवारी रात्री समुद्रात पाठलाग करून चार ट्रॉलर्स पकडले
जिल्हा राखीव दलाचा सशस्त्र दंगा काबू पथक व कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
मच्छिमारांनी हायस्पीड बोटी मालवण बंदरात आणून खलाशांना किनारपट्टीवर आणले.
कोणत्याही स्वरूपात कायदा हातात घेतला नाही व खलाशांना मारहाणही केली नाही.
यापुढे शांततेचा मार्ग अवलंबवण्यात येईल, असे मच्छिमारांनी पोलिसांसमोर स्पष्ट केले.