वीज कोसळून चौघेजण जखमी
By admin | Published: May 28, 2014 01:19 AM2014-05-28T01:19:05+5:302014-05-28T01:33:39+5:30
सांगवे बौद्धवाडीतील घटना : पावसाचा फटका
कणकवली : कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी मंगळवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सांगवे बौद्धवाडी येथील अविनाश अर्जुन कांबळे या युवकासह चौघेजण वीज कोसळून जखमी झाले आहेत. या चौघांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. फोंडाघाटसह सांगवे परिसरात तब्बल अर्धा तास पाऊस पडला. सांगवे बौद्धवाडी येथील अर्जुन नामदेव कांबळे (वय ५५) यांच्या अंगणात वीज पडून तिचा लोळ घरात घुसला. यावेळी घराच्या दरवाजात त्यांचा मुलगा अविनाश (वय २५) हा उभा होता. अचानक पडलेल्या विजेमुळे त्याला धक्का बसला. तो दरवाजातून अंगणात कोसळला. तर घरात असलेले अर्जुन कांबळे, त्यांची पत्नी अमिता कांबळे (वय ५०) व मुलगी सुप्रिया कांबळे यांनाही विजेचा धक्का बसला. अविनाश याला विजेचा जोरदार धक्का बसून तो अंगणात कोसळल्याने बेशुद्ध पडला होता. या घटनेबाबत माहिती समजताच पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत व सहकार्यांनी तत्काळ कांबळे कुटुंबीयांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अविनाशसह कुटुंबीयांची प्रकृती आता सुधारत आहे. दरम्यान, या घटनेव्यतिरिक्त तालुक्यात पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती. (वार्ताहर)