चार लाख मराठा बांधव सहभागी होणार
By admin | Published: October 21, 2016 01:12 AM2016-10-21T01:12:00+5:302016-10-21T01:12:00+5:30
सुहास सावंत : रविवारच्या मोर्चाचे नियोजन पूर्ण
सिंधुदुर्गनगरी : मराठा क्रांती मूक मोर्चा रविवार (दि. २३ आॅक्टोबर) काढण्यात येणार असून, त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. या मोर्चात चार लाख मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध तसेच महामार्गावरील वाहतुकीला अडथळा न करणारा होईल आणि तेच आमच्या मोर्चाच्या यशस्वीतेचे गमक असेल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक अॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या मोर्चाला सकाळी १०.३० वाजता ओरोस फाटा येथील अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळ्यास मराठा भगिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात होणार असून, आणि समारोप क्रीडा संकुल येथे सभेत राष्ट्रगीतानंतर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ओरोस येथे २३ आॅक्टोबरला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या अंतिम नियोजनाची बैठक गुरुवारी येथील शरद कृषी भवन येथे पार पडली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत, जान्हवी सावंत, राजू राऊळ, संतोष कदम, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते. मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बोलताना अॅड. सुहास सावंत म्हणाले की, या मोर्चाचे तालुका विभाग व गाववार नियोजन पूर्ण झाले आहे. याचा आढावा घेतला असता जिल्'ातून व बाहेरुन येणाऱ्या मराठ्यांची संख्या चार लाखांवर जाईल अशी अपेक्षा आहे.
या मोर्चाचे आयोजन नेटके करण्यात आले आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या नियोजनात प्रमुख कक्षापासून साडेतीन ते चार किलोमीटर अंतराच्या परिक्षेत्रात ध्वनीक्षेपक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे मोर्चाच्या सूचनांची माहिती सर्वांना मिळेल. मोर्चाची सुरुवात रविवारी सकाळी १०.३० वाजता ओरोस फाटा येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन होणार आहे. हा मूक मोर्चा असल्याने यामध्ये घोषणा किंवा आपआपसात चर्चा होणार नाही याची दक्षता मोर्चेकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. हा मोर्चा अर्ध्या तासात क्रीडा संकुल येथे पोहोचेल. त्याचवेळी पाच मराठा भगिनी भाषण करतील व राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल. तत्पूर्वी कोपर्डी येथील पीडित मराठा भगिनीला श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व मराठा समाज करणार असल्याने त्यात कोणाला वेगळे पार्कींग किंवा वेगळा प्रोटोकॉल दिला जाणार नाही. मोर्चासाठी जसे मराठा येणार तसेच त्यांनी शिस्तीत आपल्या पार्किंगकडे जायचे आहे, असेही अॅड. सावंत म्हणाले. (प्रतिनिधी)