चौपदरीकरणाचा शुभारंभ आॅक्टोबरमध्ये

By admin | Published: July 23, 2016 11:10 PM2016-07-23T23:10:37+5:302016-07-23T23:47:45+5:30

विनायक राऊत : महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

The four-level launch will begin in October | चौपदरीकरणाचा शुभारंभ आॅक्टोबरमध्ये

चौपदरीकरणाचा शुभारंभ आॅक्टोबरमध्ये

Next

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहीती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पाहणी करून कणकवली ते झाराप रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरील धोकादायक खड्डे तात्काळ बुजवा, असे आदेश त्यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
महामार्गावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून कणकवली येथील तलाठी उत्तम पवार यांचा शुक्रवारी या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून शनिवारी सायंकाळी कुडाळ शहरातूप जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष राजन नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, महामार्ग विभागाचे उपअभियंता ए. टी. आवटे व अन्य अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ येथील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी यावेळी त्यांनी केली व रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची तात्काळ दुरूस्ती करावी असे आदेश दिले. खासदार राऊत या महामार्गाची पाहणी करीत असताना तेथून कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे जात होते त्यांनी त्याठिकाणी थांबून महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती खासदारांना दाखविली. महामार्गाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून उपाययोजना करणे गरजेचे आहे. रविवारी सकाळपासून कणकवली ते झाराप या महामार्गाची दुरूस्ती करावी व याठिकाणी सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपण तेथे उपस्थित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असून जिल्ह्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The four-level launch will begin in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.