खवले तस्करप्रकरणी आणखी चार अटकेत
By Admin | Published: February 12, 2016 10:48 PM2016-02-12T22:48:04+5:302016-02-12T23:38:42+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांच्या वाढलेल्या किमती वन्यजीव प्राण्यांच्या मुळावर उठल्या आहेत.
दापोली : खवले विक्रीप्रकरणी हाती आलेल्या दोन संशयितांमुळे आता आणखी चारजणांपर्यंत पोहोचण्यात वनखात्याला यश आले आहे. खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे चौघेही मंडणगड, दापोली परिसरातील असून, मांजराला मारून खवले काढून देण्याची जबाबदारी पार पाडत असत. त्यांच्या अटकेमुळे आणखी काही लोक हाती लागण्याची शक्यता आहे.कोकणात आढळणारे खवले मांजर हा वन्यजीव प्राणी धोक्यात आला असून, त्याची खवल्यांसाठी होणारी हत्या चिंतेचा विषय बनली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांच्या वाढलेल्या किमती वन्यजीव प्राण्यांच्या मुळावर उठल्या आहेत. दापोली तालुक्यातील वाकवली येथे सहा लाख रुपये किमतीच्या खवले मांजर तस्करी प्रकरणावरून सिद्ध होत आहे. मात्र, असे असले तरीही कोणतेही शस्त्र नसलेला वनविभाग याला आळा कसा घालणार, यावर वन्यजीव प्राण्यांचे भवितव्य अवलंबून आहे.खवले मांजर खवले तस्करी करणारी टोळी तालुक्यात सक्रिय असल्याची टीप रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रत्नागिरी पोलिसांनी रात्रीच सापळा रचून संतोष पवार, अशोक पवार (सातारा) या दोन सख्ख्या भावांना वाकवली येथे ६ लाख रुपये किमतीचे खवले मुद्देमालासह ताब्यात घेतले. भंगार व्यवसाय करणाऱ्या या दोन सख्ख्या भावांना अटक झाली. दापोली पोलिसांनी पुढील तपासाकरिता त्यांना ९ फेब्रुवारीला वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानुसार तपास सुरू झाला. त्यात शिकार करणारे नीलेश वाघमारे, महेश जाधव (कुडावळे), दीपक जाधव (दुधेरे-मंडणगड), सचिव पवार (पोयणार) या चारजणांची नावे समोर आली. ते पळून जाण्याच्या आत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. एकमेकांशी संपर्क ठेवून जंगलात कोयती, कुऱ्हाड, चाकू, सुरा, दांडक्याच्या साहाय्याने शिकार केली जायची. बिळातील खवले मांजर उकरून काढण्यासाठी हत्याराचा वापर केला जायचा. खवल्या मांजराची शिकार केल्यावर त्याच्या अंगावर गरम पाणी टाकून कातडी सोलून घेऊन खवले काढण्यात येत असल्याची कबुलीसुद्धा संशयित आरोपींनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवल्या मांजराच्या खवल्यांना विशेष महत्त्व असल्याने खवले तस्करी टोळीचा मुख्य सूत्रधार तुटपुंज्या किमतीत शिकाऱ्याकडून ते खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये कमवत आहेत. या तस्करीतील मुख्य सूत्रधार अजून वनविभाग, पोलीस यांच्या हाताला लागलेला नाही. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
खवले मांजर प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वनविभागाने तपासाची चक्रे फिरवत कुडावळे, पोयनार, दुधेरे, कातकरवाडीतील चारजणांना अटक केली आहे.
माल नेमका जायचा कोणाकडे?
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटात सहा महिन्यांपूर्वी खवले मांजर तस्करी करणारे रॅकेट पकडण्यात चिपळूण पोलिसांना यश आले होते. त्यापाठोपाठ दापोली तालुक्यातील अशा प्रकारची तस्करी करणारे रॅकेट पकडण्यात आले होते. शिकार करणाऱ्या आरोपींना अटक झाली आहे. परंतु, हा माल कोणाकडे जायचा, याचा शोध अजून बाकी आहे.
वन्यजीव वाचविण्याची जबाबदारी केवळ वन विभागाचीच नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने वन्यजिवांची काळजी घ्यावी. वन्यजीव निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवण्यासाठी जागरुक नागरिकांनी समोर यावे. तसेच शिकारीला आळा घालावा.
- राजेंद्र पत्की,
वनपरिक्षेत्र अधिकारी