बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:47 PM2022-08-08T13:47:57+5:302022-08-08T13:48:23+5:30

आज, सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार.

Four more arrested in leopard skin smuggling case, big racket likely to be exposed | बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणी आणखीन चौघांना अटक, मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

Next

सुधीर राणे

कणकवली : कणकवली तालुक्यातील तळेरे येथे चार दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या दोघांना अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या त्या दोन संशयितांच्या चौकशीत याप्रकरणी आणखी चार संशयितांची नावे पुढे आली आहेत. त्या चौघांना कणकवली पोलिसांच्या पथकाने काल, रविवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यांना आज, सोमवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या सखोल चौकशीत बिबट्या कातडीचा व्यवहार हा कुंभवडे-गावठणवाडीतील श्रीराम सखाराम सावंत  (वय २८) याच्यामार्फत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यापर्यंत ते संशयित कसे पोहोचले याची चौकशी केली असता कुंभवडे-शाळेवाडीतील संतोष मधुकर मेस्त्री (४३ ) याचे नाव पुढे आले. संतोष मेस्त्री हा यातील संशयित आरोपी राजेंद्र पारकर (वळीवंडे) याच्या संपर्कात होता. संतोष मेस्त्री हा रामगड येथे हार्मोनियम पेटी बांधण्याचे काम करतो. तो कुंभवडेत येवून जावून असतो. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो कुंभवडे येथेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी संतोष मेस्त्रीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीराम सावंतलाही ताब्यात घेण्यात आले.

श्रीराम याला बिबट्याची कातडी कुणी दिली? याची विचारणा केली असता आप्पा हरिश्चंद्र सावंत (भिरवंडे-परतकामवाडी) याने दिल्याचे त्याने सांगितले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्यासोबत मंगेश पांडुरंग सावंत (५४, भिरवंडे-परतकामवाडी) हाही असल्याचे सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आप्पा सावंत, मंगेश सावंत या दोघांनी दोन वर्षापूर्वी बिबट्याची शिकार केल्याचे पुढे येत आहे.
तीन महिन्यापूर्वी ते कातडे विक्रीच्या उद्देशाने श्रीराम सावंत याच्याकडे देण्यात आले होते. मात्र ती शिकार कुठल्या जंगलात केली, त्यांच्यासोबत आणखी कोण होते? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी हे तळेबाजार, वळीवंडे येथील आहेत.

तळेबाजार येथून तळेरेच्या दिशेने त्या कातडीची वाहतूक होत होती. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्याची खबर लागताच दोघांना चार दिवसापूर्वी कातड्यासह ताब्यात घेण्यात आले होते. यातून रविवारी आणखी चार संशयितांची नावे पुढे आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

बिबट्यांच्या वाढत्या शिकारी पाहता यामध्ये मोठे रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संशयित संतोष मेस्त्री, श्रीराम  सावंत, आप्पा  सावंत, मंगेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, वृषाली बरगे करत आहेत.

Web Title: Four more arrested in leopard skin smuggling case, big racket likely to be exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.