जिल्ह्यात वीज पडून चार जखमी
By admin | Published: June 15, 2017 11:07 PM2017-06-15T23:07:33+5:302017-06-15T23:07:33+5:30
जिल्ह्यात वीज पडून चार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी वीज पडून ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये एकूण चारजण जखमी झाले आहेत. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-आरोसबागवाडी येथील सुमित्रा लक्ष्मण धुरी व त्यांचा मुलगा दत्तात्रय धुरी, तर दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील सोनू खरवत (वय ५५) व सुनंदा खरवत (५०) या पती-पत्नीचा समावेश आहे. सुमित्रा धुरी यांचे दोन्ही पाय भाजले आहेत. त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या भागातील काही घरातील वीज उपकरणेही विजेच्या धक्क्याने जळून खाक झाली आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पाऊस चांगलाच बरसला आहे. समुद्र खवळला असून, किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकत आहेत. जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, नुकसानीचा आकडा लाखो रुपयांच्या घरात पोहोचला आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मच्छिमार बांधवांनी वर्तविली आहे.
गुरुवारी दुपारी बांदा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सुमित्रा धुरी घराच्या मागच्या पडवीत आपल्या कुटुंबीयांसह जेवणासाठी बसल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उजव्या हातावर आणि दोन्ही पायांवर विजेचा लोळ कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचा मुलगा दत्तात्रय धुरी याला किरकोळ दुखापत झाली. येथील स्थानिकांनी त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी त्यांच्यावर उपचार केले.
सद्य:स्थितीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे डॉ. कासार यांनी सांगितले. आरोसबाग येथील विजेची उपकरणेही विजेच्या धक्क्याने नादुरुस्त झाली आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजांच्या कडकडाटामुळे बांदा शहरातील दूरध्वनी व विजेची सेवा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित करण्यात आली होती.
गुरुवारी दोडामार्ग तालुक्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह काही भागात जोरदार पाऊस कोसळला. तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथील सोनू खरवत यांच्या घरावर दुपारी साडेतीन वाजता विजेचा लोळ कोसळला. यावेळी सोनू खरवत हे पडवीत बसले होते व त्यांची पत्नी व मुले बाजूला बसली होती. या विजेचा धक्का त्यांनाही बसला. काही काळ त्यांचे शरीर सुन्न झाले.
या धक्क्याने सोनू खरवत यांच्या पाठीवर व हातावर व्रण उठले, तर पाठीवरचा काही भाग काळपट पडला. विजेच्या लोळामुळे घराच्या भिंतीना भेगा पडल्या. तसेच घराच्या छपराचेही मोठे नुकसान झाले. वीजमीटर तसेच घरातील उपकरणेही जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा विजेचा लोळ ज्याठिकाणी पडला त्याठिकाणी गॅस सिलिंडर होता. जर लोळ गॅस सिलिंडरच्या बाजूने गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता.