कुडाळमधील चार दुकाने भीषण आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:52 PM2017-12-24T23:52:48+5:302017-12-24T23:53:40+5:30
रजनीकांत कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या फटाक्यांच्या दुकानाला रविवारी रात्री भीषण आग लागली. ही घटना साडेदहाच्या सुमारास घडली असून, आग पसरल्याने शेजारील अन्य तीन दुकाने खाक झाली आहेत. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ बाजारपेठेत भोगटे फटाके दुकान असून, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या दुकानाला आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणावर फटाके असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता दुकानाच्या शेजारील कॉस्मेटिक, कपडे आणि चपलाचे दुकान आगीत सापडले. आग विझविण्यासाठी तातडीने कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी येथून अग्निशमनचे बंब मागविण्यात आले. मात्र, ते बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. विविध प्रकारच्या फटाक्यांमुळे आग आणखीनच पसरत आहे. विद्युततारा जळाल्यामुळे परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी येथे दाखल झाले आहेत. अन्य दुकानांना आग लागून नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी त्या दुकानांतील साहित्य बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
---