आगवे ग्रामपंचायतीचा चारवेळा तंटामुक्तीचा डंका

By Admin | Published: February 4, 2015 10:16 PM2015-02-04T22:16:30+5:302015-02-04T23:56:45+5:30

वादविवादांना केले हद्दपार : ग्रामस्थांच्या असलेल्या एकमुखी सहभागामुळे गावात शांतता

Four times repetition of Drama of Gram Panchayat | आगवे ग्रामपंचायतीचा चारवेळा तंटामुक्तीचा डंका

आगवे ग्रामपंचायतीचा चारवेळा तंटामुक्तीचा डंका

googlenewsNext

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा सन्मान चिपळूण तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीने मिळवला आहे. गावात कोणतेच वादविवाद नसल्याने तंटामुक्त आहे. प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांच्या असलेला एकमुखी सहभागामुळे गावात शांतता नांदत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानाला प्रारंभ झाला. दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर प्रकारचे तंटे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तडजोडीने मिटणारे सर्व तंटे गावातच मिटावेत, यासाठी गावपातळीवर समित्या प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. आगवे गावातही २००७ पासून तंटामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या १९६१ इतकी असून, ९ वाड्यांमध्ये गाव वसलेला आहे. २००९ साली आगवे ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर आतापर्यंत सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा उपक्रम गावाने केला आहे.
गावामध्ये विविध धर्मीय मंडळी असली, तरी सणवार एकत्र व शांततेने साजरे केले जातात. गणेशोत्सव व शिमगोत्सवही उत्साहाने साजरा करण्यात येतो. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी तर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मुंबईतील मनुष्यबळ विकास संस्थेतर्फे गावाच्या कार्याची दखल घेत गावाला यावर्षी ‘गुणीजन’ पुरस्कार बहाल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम गावामध्ये प्राधान्याने राबवण्यात आली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये स्वच्छता करण्यात आली. गावाला मिळालेल्या तंटामुक्त पारितोषिकांच्या रकमेतून गावामध्ये शासनाच्या अध्यादेशानुसार विविध उपक्रम राबविण्यात आले. सांस्कृतिक, क्रीडा व समाज प्रबोधनासारखे उपक्रम राबवण्यात येतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पारितोषिकेही देण्यात येत आहे.

गावात एकोपा कायम
आगवे गाव लहान असले तरी सुमारे दोन हजार लोकवस्तीचे आहे. २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानास प्रारंभ झाला. तेव्हापासून गावात तंटामुक्त अभियान राबविण्यात येत आहे. गावातील तंटे मिटवण्याबरोबर गावात शांतता राखण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. प्रत्येक कार्यक्रम राबवित असताना ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळते. एनकेन प्रकारे कोणताही वाद निर्माण झाला तर दोन्ही गटातील मंडळींना एकत्र बसवून ते वाद सोडवितो. पक्षकारही तंटामुक्त समितीच्या निर्णयाचे पालन करतात.
- जयंत घडशी, सरपंच, ग्रामपंचायत आगवे.


व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील
तंटामुक्त अभियान राबवताना व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवण्यात येत आहे. गावामध्ये शंभर टक्के दारूबंदी व गुटखाबंदी करण्यात आली आहे. व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर होत असल्याने, ग्रामस्थांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता गावात प्लास्टिक बंदी केली आहे. प्लास्टिक पिशव्या खाद्यपदार्थाबरोबर जनावरांच्या पोटात जाऊन, त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, वापरावरच बंदी घातली असून, कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावात राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला ग्रामस्थांना प्रतिसाद लाभत आहे.
- एस. बी. म्हाडळकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आगवे.

आठ वर्षे तंटामुक्त
समितीवर कार्यरत
२००७ साली तंटामुक्त अभियान सुरू झाले. तेव्हापासून समितीचे अध्यक्षस्थान भूषवित आहे. गावामध्ये कोणतेही तंटे नाही. जमिनीवरून किंवा अन्य कारणावरून वाद झालाच, तर तो मिटवण्याचा १०० टक्के प्रयत्न करतो. ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असल्यानेच, सलग चारवेळा तंटामुक्त होण्याचा बहुमान मिळाला. २००९ साली मिळालेल्या तंटामुक्त अभियानाच्या दोन लाख पारितोषिकाच्या रकमेचा शासकीय अध्यादेशाने विनियोग करण्यात आला. गाव तंटामुक्त राहील, प्रयत्नशील राहू.
- बाबासाहेब भुवड, अध्यक्ष,
तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत आगवे.

Web Title: Four times repetition of Drama of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.