चौपदरीकरणाच्या भूसंपादनास दोन वर्षे?
By admin | Published: June 5, 2014 12:40 AM2014-06-05T00:40:23+5:302014-06-05T00:41:39+5:30
चिपळूण, राजापूर, लांजात भूसंपादनात अडथळे
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गालगतच्या जमिनी संपादन करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. चिपळूण, लांजा, राजापूरसह काही बाजारपेठांतील जागांचे संपादन करण्यात अडथळे असून, तेथे रस्ता रुंदीकरणात काहीअंशी शिथिलता दिली जाण्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सुरू आहे. पत्रकारांनीही त्यासाठी पुढाकार घेऊन आंदोलने केली होती. वाढत्या अपघातामुळे तसेच वारंवार होणार्या वाहतूक कोंडीमुळे महामार्ग चौपदरीकरणाचा विषय गाजत आहे. जनरेट्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागत असून, रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी १६१ कि. मी. ते झाराप ४५० कि.मी. या अंतराकरिता चौपदरीकरण होणार आहे. कशेडी ते संगमेश्वरपर्यंत १६१ ते २६५ कि.मी., संगमेश्वर ते राजापूर विभागात २६५ ते ३५१ कि.मी.व राजापूर ते झाराप ३५१ ते ४५० कि.मी. अशा चार टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. चौपदरीकरणाच्या कामासंबंधी शासन आदेशानंतर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणासाठी आवश्यक ८० मीटर्स रुंद जागेच्या संपादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे चौपदरीकरण प्रत्यक्षात येण्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) धोरण शिथिल होणार मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना रुंदीकरण वा भूसंपादनात काही अडचणी आहेत. चिपळूण बाजारपेठेतून हा रस्ता जाणार असल्याने तेथेही भूसंपादन होणार आहे. मात्र, दुकाने जवळ असल्याने तेथे रुंदीकरणाबाबत काही शिथिलता असावी, अशी मागणी असल्याने तशी शिथिलता महामार्गावरील बाजारपेठांना देण्याचा धोरणात्मक निर्णय होण्याचे संकेत आहेत.