चालत जाणाऱ्या चार युवती ताब्यात : रेल्वे रूळावरून गोवा ते वेंगुर्ला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:59 PM2020-04-16T17:59:38+5:302020-04-16T18:02:28+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे नोकरीनिमित्त असलेले अनेक युवक-युवती लॉकडाऊनमुळे गोव्यामध्ये अडकून पडले आहेत. सुरुवातीला येथील राजकीय पुढारी तसेच सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या होत्या.
सावंतवाडी : गोवा येथून रेल्वे रूळावरून चालत गावी जाणाºया वेंगुर्ला व कणकवली येथील चार युवतींना बुधवारी मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना त्या त्या तालुक्यातील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सिंधुदुर्गात येणाºया कोणालाही घरी पाठविण्यात येणार नसून त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे नोकरीनिमित्त असलेले अनेक युवक-युवती लॉकडाऊनमुळे गोव्यामध्ये अडकून पडले आहेत. सुरुवातीला येथील राजकीय पुढारी तसेच सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या होत्या. तर या युवक-युवतींना सिंधुदुर्गात आणण्यासाठीही राजकीय पक्षांकडून प्रयत्न झाला होता. मात्र, दोन राज्यांचा हा विषय असल्याने याला बंधन आले होते.
मात्र, सद्यस्थितीत या युवक युवतींची मोठ्या प्रमाणात गोव्यात गैरसोय होत असल्याने काहींनी रेल्वे रुळावरून चालत घर गाठण्याचे ठरविले. सुरुवातीला काही गावांमध्ये अशाप्रकारे काहीजण दाखल झाले. बुधवारी दुपारी गोव्यावरून चालत येणाºया चार युवतींना सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. रेल्वे कर्मचाºयांनी पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चारही युवतींना ताब्यात घेतले. यातील दोन वेंगुर्ला येथील तर दोघीजणी कणकवली येथील आहेत.
ताब्यात घेतलेल्या चारही युवतींची पोलीस ठाण्यांमध्ये आरोग्य तपासणी करून त्या चौघांनाही त्या-त्या तालुक्यातील क्वारंटाईन कक्षात हलविण्यात आले. याबाबत तहसीलदार म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गोव्यातील अडकलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींनी अशाप्रकारे येणे चुकीचे आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने येण्याचे कोणीही धाडस करू नये. आल्यास त्यांना घरी न पाठविता क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार आहे.